प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : महानगरपालिकेने तयार केलेल्या कच्च्या प्रभाग रचनेत निवडणूक आयोगाने तब्बल 28 बदल सुचवले होते. त्यानंतर जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर सुमारे साडेतीन हजार हरकती आल्या होत्या. या सुनावणीसाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची समिती नेमली होती. या समितीने आपला अंतिम अहवाल महापालिकेच्या माध्यमातून शासनास 10 मार्च रोजी सादर केला होता. त्यावर मंगळवारी निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली. त्यानुसार आयोगाने सुचविलेले बदल महापालिका बुधवारी पूर्ण करणार असून लगेच गुरूवारी अंतिम प्रभाग रचना आयोगाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. या बदलानुसार 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना महानगरपालिका तसेच महनगपालिकेच्या संकेतस्थळावर बदलांसह जाहीर केली जाणार आहे.
पुण्याच्या प्रभाग रचनेचा प्रवास
28 जानेवारी : प्रारूप प्रभाग रचनेस आयोगाची मान्यता
1 फेब्रुवारी : प्रारूप प्रभाग रचना जाहीर
1 ते 14 फेब्रुवारी : प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागविल्या
17 ते 26 फेब्रुवारी : हरकती आणि सूचना सुनावणी
10 मार्च : सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुनावणी अहवाल आयोगास सादर
10 मे : आयोगाकडून अहवालाबाबत महापालिकेस बदलांच्या सूचना
173 जागांसाठी निवडणूक
17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लगेचच पुढील काही दिवसांत या निवडणुकासाठींच्या आरक्षण कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. पुण्यासाठी 58 प्रभाग असतील. त्यात 57 प्रभाग तीन सदस्यीय, तर एक प्रभाग 2 सदस्यांचा आहे. तर 173 जागांसाठी निवडणूक होणार असून 23 जागा अनुसूचित जातींसाठी, तर 2 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असतील. तर 148 जागा खुल्या गटासाठी असतील. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकांचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम
आयोगाच्या सूचनेनुसार 11 मेपर्यंत अंतिम प्रभाग तयार करणे
12 मे रोजी अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविणे
17 मे रोजी महापालिकेच्या संकेतस्थळ तसेच फलकावर प्रभाग रचना जाहीर करणे
या महापालिकांची जाहीर होणार प्रभाग रचना
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, कल्याण- डोंबिवली, ठाणे