बालगंधर्व पुनर्विकासाच्या मुद्द्यावर ज्यांच्याशी चर्चा केल्याचा दावा पुणे महानगरपालिका करत आहे

त्या कलाकारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : आम आदमी पक्षाची मागणी...

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : प्रकल्पाची रक्कम १० कोटी रुपयांवरून १०० कोटी रुपयांपर्यंत वाढत असताना नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, नगरसेवक यांच्या सोबत व्यापक चर्चा का नाही ?

पुणेकरांचे वैभव असलेले बालगंधर्व रंगमंदिर येथे पुनर्विकासाच्या नावाखाली नवीन इमारत उभ्या करण्याच्या निर्णयावरून सध्या पुण्यामध्ये वादंग माजले आहे. अनेक कलाकार, नाट्यकर्मी, प्रतिष्ठित पुणेकर, नागरिकांनी याला विरोध दर्शवला आहे. महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात असताना याबाबत चर्चा करून लोकांच्या प्रतिक्रिया आणि कलाकारांचे मत विचारात घेऊन याबाबत निर्णय घेता आला असता..परंतु तो तसा घेतला गेला नाही आणि आता प्रशासक नेमल्यानंतर हा निर्णय गुपचूपपणे रेटला जात आहे. या प्रक्रियेमध्ये पुरेशी पारदर्शकता नाही. याचा निषेध आम आदमी पक्षाने व्यक्त केलेला आहे. अनेक कलावंतांनी देखील विरोध दर्शविला आहे. 

याबाबत महापालिका प्रशासनाने समिती स्थापन केली होती असे आता सांगण्यात येत आहे. त्यात महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समिती अध्यक्ष, माजी स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, वास्तुशिल्पकार (भवन), आर्किटेक्ट यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, नाट्यकर्मी श्रीरंग गोडबोले, बालगंधर्व परिवाराच्या अनुराधा राजहंस, दिग्दर्शक प्रविण तरडे, निवेदक सुधीर गाडगीळ, आशय फिल्म क्लबचे विरेंद्र चित्राव यांचा समावेश होता असे प्रसिद्धी माध्यमातून आम्हाला कळले आहे. 

या निर्णयाबाबत आणि प्रक्रियेबाबत विजय कुंभार (राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष) आणि आम आदमी पक्ष खालील प्रश्न व शंका उपस्थित करत आहे.

१) ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, नाट्यकर्मी श्रीरंग गोडबोले, बालगंधर्व परिवाराच्या अनुराधा राजहंस, दिग्दर्शक प्रविण तरडे, निवेदक सुधीर गाडगीळ, आशय फिल्म क्लबचे विरेंद्र चित्राव* या आठ सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींची सदर बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या आणि पुनर्विकास करण्याच्या प्रश्नावर काय भूमिका आहे हे अद्यापही समजू शकलेले नाही. *यापैकी सुनील महाजन यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला विरोध केल्याचे वर्तमानपत्रातून समजते. इतर राहिलेल्या सात जणांची मात्र याबाबत काय भूमिका आहे हे कळायला मार्ग नाही. तरी आम आदमी पक्ष या प्रेस रिलिजच्या माध्यमातून त्यांना आवाहन करत आहे की त्यांनी याबाबतची त्यांची भूमिका जाहीररित्या मांडावी.

२) २०१८ साली १० कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या प्रकल्पाची रक्कम १०० कोटी रुपयांपर्यंत कशी काय वाढली? याबाबत वरील कलाकारांना कल्पना दिली गेली होती का ? सध्याची १४ नाट्यगृहे नीट चालवण्याबाबत तरतूद करण्याऐवजी एकाच प्रकल्पावर १०० कोटी रुपये खर्च करणे कितपत उचित आहे ?

३) प्रकल्पाची रक्कम एवढ्या मोठ्या प्रमाणावर १०० कोटीपर्यंत वाढत असताना व्यापक पातळीवर इतर कलाकार, पुण्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी याबाबत चर्चा का करण्यात आली नाही ? गेल्या तीन वर्षात याबाबत पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये चर्चा का करण्यात आली नाही ?

४) महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात असताना हा निर्णय न घेता प्रशासक नेमल्यानंतर हा निर्णय का रेटला जातो आहे ? 

५) महानगरपालिकेची १४ नाट्यगृहे, कलादालने असून देखील त्यांचा पूर्ण क्षमतेने का वापर होत नाही? बालगंधर्व रंगमंदिर पासून २०० मीटर वर घोले रोड येथील कलादालन उपलब्ध असताना देखील अजून दोन प्रशस्त कलादालन, अजून दोन नाट्यगृहे यांचा आग्रह कशासाठी ? 

६) अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधी नाही म्हणून महानगरपालिकेच्या तब्बल २२५ एकरच्या ॲमिनिटी स्पेसेस, मोकळ्या जागा विकायला निघालेली पुणे महानगरपालिका या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये कशी उभे करणार आहे ?*

७) २०१८ साल आणि २०२२ सालच्या पुनर्विकास प्रस्तावामध्ये असे काय महत्त्वपूर्ण बदल झाले की पूर्वी विरोध करणारी राष्ट्रवादी काँग्रेस आता या मुद्द्यावर भाजपच्या सोबत आहे ?

वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत अशी मागणी आम आदमी पक्ष व्यक्त करत असून याबाबत व्यापक जनमत घेतले जावे. पुणेकर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार यांच्याशी चर्चा करण्यात यावी अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post