प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग ( पुणे )चा विद्यार्थी असलेल्या जय कोल्हटकर याने जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. या चढाईनंतर काल ( बुधवारी ) सायंकाळी मुंबईत त्याचे पारंपारिक थाटात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जय यांच्या मातोश्री सौ. ज्योती कोल्हटकर,वडील यशोधन कोल्हटकर यांच्यासह कुटुंबीय, सोसायटीचे पदाधिकारी, मित्र परिवार उपस्थित होते.
जय कोल्हटकर १२ मे २०२२ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजता जय एव्हरेस्टच्या शिखरमाथ्यावर पोहोचला. निष्णात रॉक क्लायम्बर असलेल्या जयचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले.जयच्या गिर्यारोहणाची सुरवात गिरी प्रेमी मध्येच झाली.संस्थेच्या पहिल्यावहिल्या 'बेसिक रॉक क्लायम्बिंग कोर्स' मध्ये तो सहभागी झाला. या कोर्समध्ये त्याला 'सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी'चा मान त्याने मिळविला. त्यानंतर त्याने रशियातील माउंट एल्ब्रस व नेपाळमधील माउंट शिखरावर गिरीप्रेमी च्या माध्यमातून चढाई केली.
गेली दोनहून अधिक वर्षे जय हा जेष्ठ प्रशिक्षक विवेक शिवदे व एव्हरेस्ट शिखरवीर भूषण हर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होता. त्याला जेष्ठ गिर्यारोहक व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे तसेच डॉ सुमित मंडाले यांचे देखील मार्गदर्शन लाभले.काल बुधवारी मुंबईत शास्त्री हॉल येथे परतलेल्या जय यांचे कुटुंबीय आणि सोसायटीमधील रहिवाशांनी जोरदार स्वागत केले . ढोल -ताशा ,लेझीम च्या ठेक्यासह पारंपरिक औक्षण करून स्वागत करण्यात आले .