प्रेस मीडिया लाईव्ह :
जीलानी उर्फ मुन्ना शेख :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाल काही मोजक्याच दिवसात संपत आहे. सध्या विद्यापीठातील कामकाज पाहता भांबावलेले कुलगुरू व विस्कळीत प्रशासन अशीच झाली आहे. उद्या दि. १२ मे २०२२ रोजी विद्यापीठाचा १२० वा पदवीप्रदान समारंभ आयोजित केला आहे .यापूर्वी ११९ वा पदवीप्रदान समारंभ दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित केला होता. विद्यापीठ अनुदान आयोग ,नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार भारतातील विद्यापीठांनी वर्षभरातून दोन वेळा पदवीप्रदान समारंभ आयोजित करणे आवश्यक आहे. म्हणजे साधारणतः दर सहा महिन्यांनी .अद्याप सहा महिने पूर्ण झालेले नसताना हा समारंभ ३० दिवस आधी आयोजित का? त्याचे कारण म्हणजे कुलगुरू दि. १७ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.आपल्या बायोडाटा मध्ये ही माहिती समाविष्ट व्हावी असे काही तरी असावे. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून इमारतींचे उद्घाटन, थंड हवेच्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यशाळांचे उद्घाटन यांमध्ये कुलगुरू महोदय व्यस्त आहेत.दिड महिन्यांपासून लघु प्रकल्प चर्चा करण्यासाठी संशोधकास दहा मिनिटे भेटण्यासाठी वेळ नाही. हा कुलगुरू कार्यालयाचा मोठा विनोद म्हणावा...?
गेल्या दोन वर्षांत वर्ल्ड रँकिंगमध्ये ८० क्रमांकाने घसरलेले विद्यापीठाचे मानांकन ,कोरोना कालावधीतील कडक बंधन असताना कुलगुरू कार्यालयातील १० पुस्तक प्रकाशन सोहळा ,अधिकाऱ्यांच्या वाढीव वेतन भत्ते यांच्या वरील चौकशी समिती, परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली गुणपत्रके व उत्तीर्ण प्रमाणपत्र, अपात्र व क्षमापित अधिकाऱ्यांची प्रकरणे, विद्यापीठातील चित्रपटांचे व वेब सिरीजचे चित्रीकरण, वेबसाईटवरील विद्यापीठाची माहिती अशा बऱ्याच प्रकारच्या चर्चा यामुळे विद्यापीठ प्रकाश झोतात आले होते. मध्यंतरी कुलगुरू यांनी इतर ठिकाणी प्रयत्न करूनही न लागलेली वर्णी हादेखील विषय चर्चेत होता. हे सगळे विषय जाता जाता बंद करावेत ,असा बहुदा विचार असावा. यामुळे प्रशासनावरची पकड सैल झाल्याने प्रशासन व्यवस्था ही डळमळीत झाली आहे. कुलगुरूंच्या या वागण्याचा इतरांनी फायदा घेतला असावा. कारण असे काही महाभाग सध्या मोर्चेबांधणी करीत असल्याचे विद्यापीठाच्या वर्तुळात चर्चा होत आहे.