कोर्टाच्या आदेशाचे पालिका प्रशासनाने पालन करावे: आम आदमी पक्ष .पुणे
पुणे : भयंकर उन्हाळ्याने नागरिकांची अक्षरशः लाही लाही केली आहे, अशा वेळी पालिका प्रशासनाच्या, राजकीय नेत्यांच्या आणि टँकर माफियांच्या संगनमताने सामान्य पुणेकर मात्र तहाणलेलेच आहेत. पाणी ही मूलभूत गरज असताना देखील, पुणे शहरासह मनपा कार्यक्षेत्रात समाविष्ट २३ गावातील नागरिकांना पाण्यासाठी शुक्लकाष्ठ सहन करावे लागत आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर देखील महापालिका प्रशासन समाविष्ट २३ गावांमधील मोठ्या सोसायट्यांना पाणी देण्यास नकार देत आहे.
पुणे शहरात पालिका प्रशासन शहरातील राजकीय नेत्यांच्या प्रभावाने टँकर माफियांना संरक्षण देत आहे, त्यासमोर न्यायालयाच्या आदेशाची देखील पायमल्ली करत आहे.
आम आदमी पक्षाची मागणी आहे की, ज्यावेळी या गावांचा पालिका हद्दीत समावेश झाला त्यावेळपासून गावातील सोसायट्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा अथवा टँकरचे पैसे द्यावे. पुण्याच्या अनेक भागांमध्ये सुद्धा सोसायट्यांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे त्यांनाही महानगरपालिकांनी पाणीपुरवठा करावा अथवा टँकरचे पैसे द्यावे.
एकीकडे पालिका प्रशासन पुनर्विकासाच्या नावाखाली काहीही आवश्यकता नसताना अनेक ठिकाणी शेकडो कोटी रुपये विनाकारण खर्च करत आहेत मात्र नागरिकांना पाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. शहरातील तसेच या समाविष्ट गावातील लोकांच्या पाणी प्रश्नावर आम आदमी पक्ष सातत्याने लढा देत आहे, शहरातील अनेक रहिवासी सोसायट्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रचंड खर्च केवळ पाण्याच्या टँकरसाठी होत असल्याचे समजते. पुढील काळात जर न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पालिका प्रशासनाने अंमलबजावणी केली तर आम आदमी पक्ष पाणी लढा अधिक तीव्र करेल.
"बालगंधर्व रंगमंदिर जे आजही अत्यंत सुस्थितीत आहे, ज्याला केवळ चांगल्या देखभालीची गरज आहे मात्र त्यावर काम न करता पुनर्विकासाच्या नावाखाली प्रशासन ₹१०० कोटी खर्च करणार आहे परंतु तहानलेल्या पुणेकरांना पाण्यासाठी पैसे नाही आहेत. आम आदमी पक्ष पुढील काळात पाणी लढा अधिक तीव्रपणे उभारणार आहे", *विजय कुंभार, आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष*
"या समाविष्ट गावात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अनेक रहिवासी सोसायटी व्यवस्थापनाच्या संपर्कात आहे, सोसायटी देखभाल खर्चापैकी बहुतांश खर्च केवळ पाण्यासाठी होत आहे. अनेक वेळा निवेदन देऊन देखील प्रशासन लक्ष देणार नसेल तर आम आदमी पक्ष आपला लढा अजून तीव्र करेल. यासाठीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल", *सुदर्शन जगदाळे, आप पाणीप्रश्न समन्वयक*