प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे, दि. 24: पृथ्वीवरील प्रत्येक सजीव घटक हा जैवविविधतेमधील महत्त्वाचा भाग असून सर्वांच्या सहअस्तित्वासाठी जैवविविधता संवर्धन ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी केले.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (आयसर), पुणे व भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन (बायफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आयसर सभागृह येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य सचिव आर. एन. शहा, आयसरचे संचालक प्रा. जयंत उदगावकर, नागपूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) रंगनाथ नाईकडे, औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) सत्यजित गुजर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.
श्री. श्रीवास्तव यांनी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्यामागील भूमिका व जैवविविधता दिनाचे महत्व विशद करुन राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून २०१४ पासून ‘महाराष्ट्र जनुक बँक प्रकल्प’साठी अनुदान प्राप्त होत आहे असे सांगितले. याची दखल घेत राज्य शासनाने हा महत्वपूर्ण कार्यक्रम यापुढे चालू ठेवण्यासह पुढील ५ वर्षांसाठी या कार्यक्रमासाठी १७० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. जयंत उदगावकर यांनी जैवविविधता संवर्धन हा कालबद्ध कार्यक्रम नसून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जैवविविधतेचे महत्व आहे असे सांगितले.
श्री. प्रसाद यांनी जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधतेची माहिती दिली. पुणे जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या शवदाहिनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पुरविण्यात येणार असून, या शवदाहिनीमुळे वृक्षतोड तसेच प्रदूषण कमी होणार असून त्याचा जैवविविधता व पर्यावरण रक्षणासाठी फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आर. एन. शहा यांनी या पुढील काळात जमिनीचे आरोग्य राखणे व भूजलाची उपलब्धता या मोठया समस्या राहणार असल्याचे सांगून या समस्यांच्या सोडवणूकीसाठी वृक्षांचे प्रमाण वाढविणे अंत्यत गरजेचे असल्याचे सांगितले.
बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी देशी गायीचे संगोपन, देशी वाण, किचन गार्डन, परसबाग, विषमुक्त भाजीपाला व अन्न यांच्या आवश्यकतेचे महत्त्व सांगितले.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 2022 ची मुख्य संकल्पना ‘बिल्डिंग अ शेअर्ड फ्यूचर फॉर ऑल लाईफ- सर्व सजीवमात्रांसाठी सामायिक भविष्याची निर्मिती’ अशी होती. त्या निमित्ताने मान्यवर वक्त्यांनी विविध विषयांवर सादरीकरणासह महत्वपूर्ण माहिती दिली.
या प्रसंगी जैवविविधता संवर्धनाचे उत्कृष्ट काम केलेल्या ३० हून अधिक व्यक्ती, स्वयंसेवी संस्था व निमशासकीय संस्थांचा सत्कार करण्यात आला. तसेच अणसुरे गावाच्या जैवविविधतेसंबंधीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील पिके, वनांतील वृक्ष, रानभाज्या, गवत, मासे व पशुधन यांची विविधता दर्शविणारे जैवविविधतेसंबंधी उपयुक्त प्रदर्शनही या ठिकाणी लावण्यात आले होते. या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या शवदाहिनीचे उदघाटन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात गाव/तालुका पातळीवर काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचे प्रतिनिधी, वन विभागाचे, जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अधिकारी-कर्मचारी, बायफ, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, पुणे विद्यापीठ, आघारकर संशोधन संस्था, पुणे व अशा इतर संस्थांमधील शास्त्रज्ञ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.