पॉईंट टू बी नोटेड :
विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप अत्युत्कृष्ट कर्मचाऱ्यांना दरवर्षी खिरापत वाटप
प्रेस मीडिया लाईव्ह :
लेखक : डॉ. तुषार निकाळजे :
पुणे : प्रत्येक कर्मचारी व अधिकारी शासकीय कार्यालयात दरवर्षी वार्षिक गोपनीय अहवाल भरून घेतला जातो.हा अहवाल संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत प्रशासन विभागाकडे पाठविला जातो . यामध्ये कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्याने वर्षभरात केलेल्या कामाचे अवलोकन असते. या अहवालामध्ये साधारणता पाच ते सहा पृष्ठे असतात. यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारून कर्मचाऱ्याचे किंवा अधिकाऱ्याची कार्यालयीन वर्तणूक कामकाज, समाजाशी वागण्याची पद्धत अशा वेगवेगळ्या बाबींवर प्रश्न स्वरूपात माहिती असते.
या प्रश्नाच्या पुढे तीन किंवा चार पर्याय(एम.सी.क्यू.) दिलेले असतात. ठीक, चांगला, उत्कृष्ट,अत्युत्कृष्ट अशा प्रकारचे पर्याय छापलेले असतात. या पर्यायांवर संबंधित विभागाचे अधिकारी बरोबर[√ } ची टिक करून, एका पाकिटात भरून, त्यावर गोपनीय असे लिहून, प्रशासन विभागाकडे जमा करतात.या जमा केलेल्या गोपनीय अहवालाचे अवलोकन प्रशासन विभागामार्फत केले जाते. तदनंतर उपकुलसचिव, कुलसचिव दर्जाचे अधिकारी याची छाननी करून ज्या कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन वर्तणूक अतिशय चांगली आहे. त्यांना अत्युत्कृष्ट पत्र देऊन सन्मानित केले जाते. बऱ्याच वेळा हे अत्युत्कृष्ट पत्र एका कर्मचाऱ्यास सलग दोन वेळा मिळते. तिसऱ्या वेळा मिळत नाही किंवा दिले जात नाही. याचे कारण काही कार्यालयांमध्ये असा नियम आहे की सलग तीन वर्ष अत्युत्कृष्ट कामगिरीचे पत्र मिळाल्यास कर्मचाऱ्यास किंवा अधिकाऱ्यास एक वेतन वाढ दिली जाते. म्हणूनच की काय कौतुक करायचे पण वेतन वाढ होऊ द्यायची नाही. असा काही प्रकार असावा याचा दुसरा भाग म्हणजे अत्युत्कृष्ट कर्मचारी कोणास म्हणावयाचे याचे एक उदाहरण पुढील प्रमाणे एखादा कर्मचारी सेवक वसाहतीमध्ये राहात असेल, तर तो तेथील वेगवेगळ्या तीन मंडळांचा (युवा मंडळ,वेगवेगळी उत्सव मंडळे, बचत गट,) सदस्य किंवा अधिकार पदावर असतो,कार्यालयातील पतपेढीच्या समितीवर सदस्य म्हणून असतो , याच बरोबर कार्यालयातील कामगार संघटनेचा सदस्य किंवा पदाधिकारी असतो.आता यावरून आपणास लक्षात आले असेलच की हा कर्मचारी थोडा नव्हे बहुतांशी राजकीय वलय असलेला असतो.
कार्यालयात काम करीत असताना आठवड्यातील सात दिवसांपैकी दिवसाआड मीटिंग च्या नावाखाली दोन तास कार्यालयाबाहेर म्हणजे एकदा युवा मंडळाची मीटिंग, दुसऱ्यांदा पतपेढीची मिटिंग, तिसऱ्यांदा कामगार संघटनेची मीटिंग असे चालू असते. हे एवढ्यावरच भागत नाही, तर शासकीय कार्यालयात कामकाज करत असल्याने वेगवेगळ्या अधिकार मंडळांच्या सदस्यांशी संपर्क व त्यांची कामे करण्यात मग्न असतो. दिवसाकाठी एक तरी काम वेगळ्या विभागात जाऊन करण्यात एक तास वाया जातो. याच बरोबर कार्यालयीन वेळेतच सामाजिक दान धर्माची कार्य करताना आढळतो. या कर्मचाऱ्यांचे दिवसभराचे वर्कशीट किंवा कार्यपत्रक किंवा दिवसभर केलेल्या कामाची माहिती पाहिल्यास त्याला कार्यालयाने नेमून दिलेल्या १०० कामांपैकी फक्त ५० ते ६० कामे पूर्ण झालेली असतात.उर्वरीत कामे प्रलंबित असल्याबाबत विचारण्याची कोणत्याही अधिकाऱ्याला हिंमत होत नाही.कारण सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर काही कर्मचारी काम पूर्ण झाले नाही म्हणून ज्यादा काम किंवा ओव्हर टाईम करतात. याचे वेगळे मानधन किंवा वेतनही मिळते हा भाग वेगळा.
परंतु हा कर्मचारी सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर ओव्हर टाईम मध्ये कोणते काम करतो? तर तो अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये एखादी फाईल घेऊन जातो व त्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करतो कि गप्पा मारतो? हे केबिनचे दार लावल्यानंतर कळतच नाही.पण जर या गोष्टीचा कानोसा घेतला तर हा कर्मचारी एक ते दीड तास त्या अधिकार्यासोबत तो कर्मचारी ज्या ज्या मीटिंगला गेला होता,त्याचे इतिवृत्त आपल्या अधिका-यास ऐकवत असतो. एवढेच नव्हे तर कार्यालयातील वेगवेगळ्या विभागांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटना,बातम्या(चुगली नाही) सांगत असतो. बहुधा या अशा कर्मचाऱ्यांना दोन तासाचे ओव्हरटाईमचे जे मानधन मिळते ते याकरताच असावे. कारण टाईमच्या फॉर्मवर केबिनमध्ये ज्या अधिकार्यांशी गप्पा मारलेल्या असतात ते अधिकारीच शिफारस व सही करतात वर्षभराने कर्मचाऱ्याने आपला गोपनीय अहवाल आपल्या अधिकाऱ्यांमार्फत पाठवल्यास हे अधिकारी त्या कर्मचाऱ्यांची कार्यालयीन काम अत्युत्कृष्ट असल्याचे शिफारस करतात. नंतर प्रशासन व मूळ नियुक्ती अधिकारी अशा कर्मचाऱ्यांना अत्युत्कृष्ट कार्य पूर्ण असे पत्र देतात.साधारणतः वर्ष २००० पर्यंत ५३ कर्मचारी एखाद्या विभागात असतील तर त्यातील एक किंवा दोन कर्मचाऱ्यांनाच अत्युत्कृष्ट कार्य पूर्तता पत्र दिले जायचे.परंतु आज एखाद्या विभागात ५६ कर्मचारी असतील तर त्यातील १७ कर्मचाऱ्यांना अत्युत्कृष्ट कार्य पूर्तता पत्र दिले जाते.यावरून अवलोकन होईलच की कर्मचारी खऱ्या अर्थाने कार्यालयाचे काम करतात किंवा अधिकाऱ्यांशी केबिन मध्ये नेटवर्किंगच्या गप्पा मारतात . यावरून असे अनुमान काढता येईल का की वर्ष २००० पर्यंत फक्त दोनच सेवक असे कार्य करत होते व आता त्यांची संख्या १७ झाली आहे.म्हणजे कार्यालयात कोणत्या प्रकारची कामे केली जातात ? याचा निष्कर्ष निघेल. वारंवार कार्यालयांमध्ये दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांचे किंवा नवीन भरतीची संख्या कमी होत आहे असे म्हटले जाते. परंतु भविष्यात या विषयावर संशोधन करावयाचे झाल्यास कार्यालयात प्रत्यक्ष काम करणारे, खुश मस्करी करणारे, राजकारणी, कामचुकार या विषयांचा समावेश होणे आवश्यक आहे. हे काहीही असले तरी आता दरवर्षी योग्य कर्मचाऱ्यांना अशी खिरापत वाटण्याचा विचार व्यवस्थेने करावा असे वाटते.