पुणेकर जनता, रसिक, कलाकार यांना अंधारात ठेवत पुणेकरांचे वैभव असणारे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर आम आदमी पक्षाची टीका

 रंग मंदिराचा तथाकथित पुनर्विकास नक्की कोणासाठी ठेकेदारासाठी की रसिक जनतेसाठी ? 

पुण्याचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरबाबत निर्णय घेताना रसिक पुणेकर, कलाकार, प्रतिष्ठित नागरिक यांना विश्वासात घेण्याची आम आदमी पक्षाची मागणी

आम आदमी पक्षाचे बालगंधर्व रंगमंदिरासमोर आंदोलन..

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : बालगंधर्व रंगमंदिर हा पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. या ठेव्याचा पुणेकरांना सार्थ अभिमान आहे. हे बालगंधर्व रंग मंदिर पाडण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार आणि प्रशासक विक्रमकुमार यांनी घेतलेला आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याचे स्वागत केले आहे. 2018 साली मुरलीधर मोहोळ यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव आणला होता आणि त्याला त्यावळी राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. आता महानगरपालिकेची मुदत संपल्यावर नगरसेवकांची कोणतीही कटकट राहिली नसताना प्रशासकांना हाताशी धरत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी यांची अभद्र युती झाल्याचे दुर्दैवी चित्र पुणेकरांना बघायला मिळत आहे. या निर्णयाबाबत कोणतीही पारदर्शकता ठेवलेली नाही. पुणेकर जनतेला, कलाकारांना, रसिकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाविरोधात आज आम आदमी पक्षाने बालगंधर्व रंगमंदिरसमोर आंदोलन करून याचा निषेध व्यक्त केला आणि सदर निर्णयाबाबत अनेक शंका व प्रश्न उपस्थित केले.

 2018 साली सुद्धा हेच बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय मुरलीधर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष असताना घेतला गेला होता... ज्याला जनसामान्यांनी आणि कलाकारांनी कडाडून विरोध केला, त्यामुळे हा निर्णय त्यावेळी मागे घ्यावा लागला होता. आता महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर अशा पद्धतीचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे. ही सर्व प्रक्रिया अपारदर्शक पद्धतीने जनसामान्यांना व कलाकारांना पुरेशी माहिती न देता रेटून नेली जात आहे. बालगंधर्व रंग मंदिर पाडून त्याचा केला जाणारा तथाकथित पुनर्विकास हा नक्की कोणासाठी ? ठेकेदारासाठी ? की पुणेकर रसिक जनता व कलाकारांसाठी ? सामान्य जनतेची आणि नगरसेवकांची कटकट नको म्हणून प्रशासक नेमला यावर जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला जात आहे का ?या प्रश्नाचे उत्तर महानगरपालिका प्रशासन पालकमंत्री अजित पवार, मनपा आयुक्त विक्रम कुमार व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी द्यायला हवं, अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे. 


"दरवेळी असा प्रस्ताव देताना अथवा निर्णय घेताना वेगवेगळी कारणे दिली जातात. 2018 साली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचे कारण पुढे करत बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता. आता 2022 मध्ये मेट्रोसाठी लागणारे पार्किंग उपलब्ध व्हावं म्हणून बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय होत आहे, अशी चर्चा आहे. नक्की कशासाठी बालगंधर्व रंगमंदिर पाडले जात आहे ? तशी मागणी कोणी केली आहे ? याबाबत कुठलीही माहिती सार्वजनिकरीत्या जाहीर केलेली नाही... *ही माहिती सार्वजनिक करावी, पारदर्शकता ठेवावी आणि पुणेकर रसिक जनता, कलाकार, प्रतिष्ठित पुणेकर नागरिक यांना विश्वासात घेत बालगंधर्व रंगमंदिरबाबत पुढील वाटचाल निश्चित करावी", अशी मागणी *आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.


पुणे शहराला सांस्कृतिक, वैचारिक वारसा आहे. शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या सल्ल्याने, मार्गदर्शनाने संपूर्ण भारतावर यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्याचा ठसा उमटवला आहे. असे असून सुद्धा पुण्यामध्येच त्यात उल्लेखनीय काम केलेल्या लोकांना मात्र विचारात न घेता निव्वळ आर्थिक लोभापोटी आणि राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी जनमत न घेता, पारदर्शकता न पाळता अनेक प्रकल्प राबविले जातात. पुढे ते अयशस्वी होताना आपण पाहिले आहे. उदा. विद्यापीठ उड्डाण पूल. 

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास सुद्धा अशाच पद्धतीने भरकटला जाईल, याची भीती पुणेकरांच्या मनामध्ये आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली महानगरपालिकेच्या इतर नाट्यगृहमध्ये पालिकेने खेळखंडोबा अगोदरच मांडलेला आहे. अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची लाखो रुपयांची साऊंड सिस्टिम चोरीला जाण्याचा प्रकार याच पुण्यात घडलेला आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या स्वच्छतेबाबत उदासीन असलेली पुणे महानगरपालिका आता पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली काय करणार आहे, ऐतेहासिक ठेव्याचे काय होईल या कल्पनेनेच सर्वसामान्य रसिक पुणेकर घाबरलेले आहेत.

जनतेला विश्वासात घेत याबाबत पुढील वाटचाल व्हावी, अशी आपची मागणी आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post