प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी सैनिकी मुलां-मुलींसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून इच्छुक युद्ध विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक व सेवारत सैनिक यांनी आपल्या पाल्याच्या वसतिगृह प्रवेशासाठी संबंधित वसतिगृह अधीक्षक किंवा अधीक्षिका यांच्याकडे ३० जून २०२२ पर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (नि.) यांनी केले आहे.
मुलां-मुलींच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित माहिती पत्रक व प्रवेश अर्ज पर्वती येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह व नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे १ जूनपासून कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
प्रवेशासंबधी वसतिगृह व्यवस्थापन समितीची बैठक संबधित वसतिगृहामध्ये सोमवार ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार असून पालकांनी व प्रवेश घेणाऱ्या पाल्यांनी संबंधित वसतिगृहामध्ये उपस्थित राहावे. यावेळी सेवानिवृत्तीबाबतचे पुस्तक, पीपीओ, माजी सैनिक ओळखपत्र, विधवा ओळखपत्र, ईसीएचएस ओळखपत्र आदी सैन्यातील कागदपत्रे सोबत आणावीत.
विद्यापीठाची प्रवेश प्रक्रियेस विलंब होत असल्यास वसतिगृह प्रवेश अर्ज जमा करण्याची तारीख वाढवून देण्यात येणार आहे, असेही कळवण्यात आले आहे.