राज्यातील 14 महानगरपालिकांना 17 मे 2022 पर्यंत अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा आदेश

आयोगाच्या या आदेशामुळे राजकीय हालचालींना वेग येणार ..



प्रेस मीडिया लाईव्ह :

  राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी परिपत्रक जारी करत राज्यातील 14 महानगरपालिकांना 17 मे 2022 पर्यंत अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. या शिवाय प्रभागाचा नकाशा, सर्व परिशिष्ठे महानगरपालिकेच्या सूचना फलक आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचना आयोगाने केली आहे. आयोगाच्या या आदेशामुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

या आदेशाप्रमाणे राज्यातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, अकोला, सोलापूर या मुदत संपलेल्या महानगरपालिकांना अंतिम प्रभाग रचना निश्चित करून मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवावी लागणार आहे.

ईतर मागासवर्ग समाजाच्या राजकीय आरक्षणा शिवाय महानगरपालिका निवडणुका होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने निवडणूक प्रक्रियेचे अधिकार आपल्याकडे घेतले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारच्या मनसुब्यावर पाणी फेरले असून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी संबंधित महापालिका आयुक्तांसाठी आदेश जारी केले आहेत.

प्रारूप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने २८ जानेवारी २०२२ रोजी मान्यता दिल्यानंतर १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या. या हरकती आणि सूचनांवर १६ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सुनावणी घेऊन त्या अंतिम करण्यात आल्या, मात्र त्यानंतर ४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती दिल्याने अंतिम प्रारूप जाहीर करण्यात आले नव्हते. आता सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी दिलेल्या निर्णयानुसार निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अंतिम प्रभाग रचनेचे कामकाज पूर्ण करण्याचा दिनांक : ११ मे २०२२
प्रभाग रचनेच्या अंतिम प्रस्तावास मान्यता घेऊन प्रस्ताव निवडणूक आयुक्तांना सादर करण्याचा दिनांक : १२ मे २०२२

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, अकोला, सोलापूर आणि नाशिक

Post a Comment

Previous Post Next Post