अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तात्काळ जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : जेल मध्ये असेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालावली गंभीर आहे. त्यांना स्ट्रेचरुन जेजे रुग्णालयात नेण्यात आले आहे.मागील तीन दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारी(आज) अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तात्काळ जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.
नवाब मलिक मुत्राशयाच्या त्रासाने त्रस्त असून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला कारागृहातील डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे पायाला सतत सूज येत असल्याची माहिती मलिक यांनी न्यायालयाला दिली आहे. तसेच पाय दुखत असल्याचे कारागृह प्रशासनाला सांगितले असता वेदनाशामक (पेनकिलर) औषधे दिली जातात. मात्र, या आजारावर कायमस्वरुपी उपाय आवश्यक असल्याचेही मलिकांनी सांगितले. त्यानुसार खाजगी रूग्णालयात आपल्याला हे उपचार घ्यायचे असून त्यासाठी तातडीने जामीन मंजूर करण्याची मागणी अर्जातून करण्यात आली आहे.
वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याची मागणी कऱणारा अर्ज त्यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात सादर केला आहे. त्याची दखल घेत या अर्जावर ईडी आणि कारागृह प्रशासनाला सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे 'ईडी'ला तपासात आढळले. त्यानुसार 'ईडी'नं कारवाई करत मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नवाब मलिक यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी ताताडीचा दिलासा नाकारल्याच्या निर्णयाला नवाब मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत तातडीच्या सुटकेची मागणी केली होती. मात्र, याप्रकरणी तपास अद्याप सुरू असल्यानं तूर्तास यात सध्या हस्तक्षेप करू इच्छित नाही, तुम्ही नियमित न्यायालयाकडे रितसर जामीनासाठी अर्ज करू शकता. असे स्पष्ट करत ही याचिका ऐकण्यासच नकार देत सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.