त्या विचारांचा वसा व वारसा जपण्याची व कार्यरत राहण्याची आज गरज आहे...प्राचार्य आनंद मेणसे



प्रेस मीडिया लाईव्ह :

मलकापूर ता. २१ लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानाचा व त्यातील शेवटच्या माणसाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो राज्यकारभार केला तो आजच्या संसदीय लोकशाहीमध्येही अत्यंत स्पृहणीय व अनुकरणीय आहे. शाहूंराजांच्या विचार आणि कार्याची प्रस्तुतता सर्वांगीण समता प्रस्थापित होईपर्यंत कायम राहणार आहे. त्यांनी शेती, शिक्षण,सहकार,व्यापार,उद्योग,कला यासह समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचे काम केले.त्या विचारांचा वसा व वारसा जपण्याची व कार्यरत राहण्याची आज गरज आहे,असे मत प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले. ते 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार व कार्याची प्रस्तुतता ' या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करतांना बोलत होते.रयत शिक्षण संस्थेचे प्रा.डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालय ( मलकापूर ),प्रा.डॉ.एन.डी.पाटील प्रतिष्ठान आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र आयोजित केले होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ञ व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष  प्रा.डॉ.जे.एफ.पाटील होते.ज्येष्ठ इतिहासतज्ञ प्राचार्य डॉ.प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील व प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी हे मार्गदर्शक वक्ते होते.प्राचार्य डॉ.सुनील हेळकर यांनी स्वागत केले. समन्वयक प्रा.डॉ.सुप्रिया खोले यांनी प्रास्ताविक केले.प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच भित्तीपत्रक व  ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.

चर्चासत्राच्या  दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील आणि तिसऱ्या सत्रात प्रसाद कुलकर्णी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्य कर्तृत्वाची मांडणी केली.चौथ्या सत्रात विविध अभ्यासकांनी शोधनिबंध सादर केले.तसेच सहभागीचे मनोगत झाले.आणि प्रश्नोत्तरेही झाली.सर्व सहभागीना प्रमाणपत्रे देण्यात आली.अध्यक्षीय भाषणात डॉ.जे.एफ.पाटील यांनी शाहू राजांच्या विचारांची आजच्या राजकारण,समाजकारण, अर्थकारण यातील गरज अधोरेखित केली.चर्चासत्राचा समारोप प्राचार्य डॉ.सुनील हेळकर यांनी केला.प्रा.डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात झालेल्या या राष्ट्रीय चर्चासत्रात विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.आभार प्रा.एम.एल.सोनटक्के यांनी मानले.प्रा.पी.एस.नाईक व प्रा.प्रज्ञा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post