प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर ता.२९ स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असतांना आजच्यासारखा सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक व राजकीय अस्वस्थतेचा काळ कधीच अनुभवाला आला नव्हता. व्यक्तिगत धर्मापेक्षा राष्ट्रधर्म मोठा आहे हा शाहू राजांचा विचार बाजूला पडून धर्मांधता आणि परधर्म द्वेषाचे विकृत राजकारण जाणीवपूर्वक केले जात आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता समाजाचे चुकीच्या पद्धतीने ध्रुवीकरण केले जात आहे. अशावेळी या व्यवस्थे विरोधात कमालीच्या सातत्याने आवाज उठवणार्या प्रसाद कुलकर्णी यांचा भाई माधवराव बागल पुरस्कार देऊन उचित गौरव केला जात आहे ही अभिनंदनाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले. भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा 'भाई माधवराव बागल पुरस्कार ' समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांना सपत्निक शाहू स्मारक भवनमध्ये एका अतिशय शानदार समारंभात देण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऍड.अशोकराव साळोखे होते.प्रारंभी भाई माधवराव बागल यांच्या प्रतिमेला प्रसाद कुलकर्णी व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाहीर रंगराव पाटील यांनी कवी श्रीनिवास यादव लिखित आणि श्याम सुतार यांनी संगीतबद्ध केलेले बागल गौरव गीत गायले. कॉ.चंद्रकांत यादव यांनी स्वागत केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.टी.एस. पाटील यांनी करून दिला. संभाजीराव जगदाळे यांनी गौरव पत्राचे वाचन केले.सन्मानचिन्ह, शाल, फेटा, मानपत्र आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. बागल विद्यापीठाच्या शिबिरातून आपल्यातील कार्यकर्ता घडण्यात मोठी मदत झाली याचा उल्लेख करून आणि कृतज्ञता म्हणून पुरस्काराच्या रकमेत एक हजार रुपयाची भर घालून प्रसाद कुलकर्णी यांनी सहा हजार रुपये बागल विद्यापीठाला देणगी रूपाने दिले.
यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी समाजवादी प्रबोधिनीच्या वाटचालीचा व उपक्रमशीलतेचा उल्लेख केला. तसेच आचार्य शांतारामबापू गरुड, प्रा.डॉ.एन.डी.पाटील ,कॉम्रेड गोविंदराव पानसरे ,प्राचार्य म.द.देशपांडे आदी अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मुशीतून माझ्यातला कार्यकर्ता घडत गेला हे स्पष्ट केले. तसेच हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यात सहभागी झालेल्या, असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे.मी या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून तो स्वीकारत आहे असे मत व्यक्त केले .तसेच भारतीय राजकारण ,अर्थकारण, समाजकारण याचा बदललेला पोत आणि त्यांनी उभी केलेली आव्हाने याची परखड मांडणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजर्षी शाहू महाराज यांच्यापर्यँत, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते भाई माधवराव बागल यांच्यापर्यंत सर्व महामानवांच्या विचारधाराआणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची विचारधारा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार असलेल्या भारतीय राज्यघटनेतील मूल्यांना पद्धतशीरपणे खेडे करून नवीन धर्म द्वेषी विकृत विचारधारा रुजवण्याचे प्रयत्न हाणून पाडायचे असतील तर सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही असे मत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ.राम पूनियानी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी पाठवलेला संदेश प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी वाचून दाखविला. या समारंभाला सरोजमाई
पाटील,प्रा.डॉ.जे.एफ.पाटील ,डॉ. रमेश जाधव ,डॉ. बी.एम. हीर्डीकर,प्रा.डॉ.अरुण भोसले, एम.बी.शेख, सुभाष नागेशकर दलितमित्र डी.डी.चौगुले ,दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, विजतज्ञ प्रताप होगाडे ,माजी आमदार राजीव आवळे, जयकुमार कोले,डॉ.चिदानंद आवळेकर,प्राचार्य डॉ.सुनील हेळकर,शशांक बावचकर,मेघा पानसरे,दिलीप पोवार,प्रा.शिवाजी होडगे,प्रा.अनिल उंदरे, वसंतराव मुळीक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजवादी प्रबोधिनीच्या अनेक शाखांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवी जाधव यांनी आभार मानले.अनिल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
अभिनंदन सर,,,,,,,आम्हाला आपला खुप अभिमान वाटतो,,,,,,खुप खुप शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete