शिवाजीनगर पोलिसांकडून चौघांना अटक ; दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यात धुमाकूळ घालत चेन स्नॅचिंग करणार्या आतंरराज्य टोळीला गजाआड करण्यात इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. मागील तीन महिन्यातील शहरातील चेन स्नॅचिंगच्या तीन घटना उघडकीस आल्या असून चौघांना अटक करण्यात आली आहे. अब्बास अस्लम झैदी ,शरीफ शहा समरेश शहा ,रफिक कासीमभाई मदारी ,व राजेश रामविलास सोनार यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांनी पञकारांना दिली.
जानेवारी ते मार्च 2022 या तीन महिन्याच्या कालावधीत 3 जानेवारी आणि 11 व 25 मार्च रोजी इचलकरंजी शहरातील विविध भागात चेन स्नॅनिंगच्या घटना घडल्या होत्या. गोकुळ चौक परिसरातील शिला तुकाराम पोरे या पायी निघाल्या असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूम स्टाईलने त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले होते. तर 3 जानेवारी व 25 मार्च रोजी कबनूर आणि इचलकरंजी परिसरात वृध्दांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अशा तर्हेने लंपास करण्यात आले होते. या तिन्ही चोरी प्रकरणी शिवाजीनगर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना बीड, परभणी, लातूर, जळगांव, बेळगांव व गोवा याठिकाणीही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले. अब्बास झैदी व त्याचे तीन साथीदारांनी या चोर्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जळगांव पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या चौघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपासादरम्यान गुन्ह्यांचे घटनास्थळावरील व आरोपींनी गुन्हा करुन येताना व जाताना गेलेल्या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज व अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे शहरात या चोरट्यांनी चेन स्नॅचिंग केल्याचे निष्पन्न झाल्यचे पोलिस उपअधिक्षक महामुनी यांनी सांगितले.
चोरट्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 40 ग्रॅम वजनाचे 2 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या टोळीने जिल्ह्यात आणखीन कोठे गुन्हे केले आहेत का या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी पञकारांना सांगितले.