२० मे रोजी प्रदर्शित होणार 'विजयी भव'



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  :  राजकारण आणि खेळ यांची अचूक सांगड घालण्यात आली आहे. असा'विजयी भव' हा चित्रपट मागील काही दिवसांपासून रसिकांपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्र चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'विजयी भव'च्या ट्रेलरनं रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचं काम केलं आहे. अत्यंत कमी वेळेत 'विजयी भव'चा ट्रेलर हजारो रसिकांपर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याची प्रतीक्षा संपली असून, २० मे रोजी 'विजयी भव' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

स्वास्तिक मोशन पिक्चर्स प्रोडक्शनची निर्मिती आणि केनिल एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या 'विजयी भव' या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती किर्तन गोर्धनभाई पटेल आणि जगदीश एम. पवार यांनी केली आहे. दिग्दर्शन शैलेश पटेल आणि अतुल सोनार या जोडगोळीनं केलं आहे. आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी जोडीच्या रूपात यश मिळवल्यानंतर शैलेश-अतुल ही नवी जोडी 'विजयी भव'च्या माध्यमातून प्रेक्षकांवर मोहिनी घालणार आहे.

आजच्या काळात बनणाऱ्या चित्रपटांपेक्षा वेगळं कथानक हे 'विजयी भव'चं प्लस पॅाईंट आहे. कथानकाला साजेशा प्रसंगांची गुंफण आणि प्रसंगानुरूप संवादलेखन काही ठिकाणी प्रेक्षकांना हसवेल, तर काही ठिकाणी अंर्तमुख होऊन विचार करायला लावेल. सुमधूर गीत-संगीत आणि नयनरम्य लोकेशन्सवर करण्यात आलेलं चित्रीकरण हे 'विजयी भव'चं आणखी एक वैशिष्टय आहे. राजकारणाच्या पटलावर कबड्डीचा डाव सादर करताना अनाहुतपणे उलगडत जाणारे कथानकातील विविध पैलू रसिकांना क्लायमॅक्सपर्यंत खिळवून ठेवतील.

'विजयी भव'ची कथा जगदीश पवार यांनी लिहिली असून, पटकथालेखन अतुल सोनार यांनी केलं आहे. मुकुंद महाले यांनी अतुल सोनार यांच्यासोबत मिळून संवादलेखन केलं आहे. इंडियन आयडॅाल फेम जगदीश चव्हाण 'विजयी भव'मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार असून, त्यानं गाणंही गायलं आहे. त्यामुळं जगदीशची अभिनेता आणि गायक अशी दुहेरी भूमिका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यात पूजा जैसवालसोबत जगदीशची जोडी जमली असल्यानं नव्या जोडीच्या केमिस्ट्रीचीही अनुभवायला मिळेल. सोनाली दळवीने यात दामिनीचे पात्र साकारले असून ती यात एका धडाकेबाज भूमिकेत दिसणार आहे. याखेरीज विनायक केतकर, जगदीश पवार, विक्रम मेहता आदी कलाकारही आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post