प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : १९४७ पेक्षा स्वातंत्र्याचे महत्त्व व मात्रा आज कमी झाली आहे, समतेच्या संकल्पनेतील स्त्री-पुरुष - आर्थिक प्रादेशिक विषमता वाढते आहे, राज्यसंस्था बळकट होण्याऐवजी व्यक्तिमहात्म्य वाढवले जात आहे. स्वातंत्र लढ्यात राज्य व राष्ट्रहित ही प्रथम असलेली संकल्पना आज दुय्यम स्थानावर ढकलून सांस्कृतिक राष्ट्रवाद अग्रभागी आणला जात आहे .त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्याने जी मुल्ये विकसित केली त्यामध्ये नवा आशय ,भरून काल सुसंगत भर घालून त्याची मांडणी करण्यासाठी लोकांनीच लोकदबाव तयार करण्याची गरज आहे. अन्यथा हा इतिहास आपल्याला माफ करणार नाही. नियतीशी नव्याने करार करावा लागेल असे मत ज्येष्ठ विश्लेषक प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या पंचेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. " स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव : समकालीन संदर्भ "हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यातून समाजवादी प्रबोधिनीच्या पंचेचाळीस वर्षाच्या कामाचा संक्षिप्त आढावा घेतला. शशांक बावचकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते व डॉ.चिदानंद आवळेकर आणि जयकुमार कोले यांच्या उपस्थितीत ' प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाच्या मे महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा.डॉ.प्रकाश पवार म्हणाले, स्वातंत्र्यलढ्याच्या विचारांशी बांधिलकी आपण सोडून दिल्याने आज अमृतमहोत्सवी वर्षातअनेक बिकट प्रश्न तयार झालेले आहेत. लोकहितवादी,लोकमान्य टिळक, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, रवींद्रनाथ टागोर,डॉ.आंबेडकर,महर्षी शिंदे, गांधीजी, नेहरू आदींनी राज्य विषयाची सखोल व विविधांगांनी मांडणी केली. त्यातून आयडिया ऑफ इंडिया अर्थात भारताची संकल्पना मांडली गेली.त्यातून वंश, धर्म,भाषा, संस्कृती,ज्ञान ही सारी वैशिष्ट्ये मान्य करून विविधतेतून एकता ही संकल्पना पुढे आली. कायदेमंडळ ते स्थानिक स्वराज्य संस्था एकसंघ भारताची संकल्पना विकसित करण्यात आली. आज त्या विविधता जपत असलेल्या एकसंघतत्वाला तडा दिला जातो आहे. डॉ. पवार यांनी या विषयाची अतिशय सखोल मांडणी केली.तसेच श्रोत्यांच्या शंकांचे निरसनही केले.
यावेळी प्रबोधनीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनोहर जोशी यांनी काही पुस्तके प्रबोधन वाचनालयाला भेट दिली. या व्याख्यानास इचलकरंजी व परिसरातील जिज्ञासू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रा. रमेश लवटे यांनी आभार मानले.