आंदोलकांनी घोषणाबाजी करत परिसर सोडला दणाणून...
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथे वाढती महागाई कमी करा, बेरोजगार भत्त्यासाठी केंद्रीय कायदा लागू करा यासह पुरवठा विभागाच्या विविध मागण्यांसाठी माकपच्या वतीने पुरवठा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
पेट्रोल -डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ होवून महागाईचा उच्चांक गाठला आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मुश्किल होवून बसले आहे.चुकीच्या धोरणामुळे केंद्र सरकार विरोधात जनतेचा आक्रोश देखील वाढू लागला आहे.याच अनुषंगाने इचलकरंजी येथे आज सोमवारी माकपच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुरवठा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करत विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.पेट्रोलियम पदार्थांवरील कर मागे घ्यावा , रेशनवर पूर्वीप्रमाणे गव्हाचे वितरण करावे, रेशनमधून डाळी व गोडतेलाचा पुरवठा करा, बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा, रेशन नियमित १० तारखेपर्यंत द्या, मासिक पेन्शन पाच हजार रुपये द्या, आदी मागण्यांचा समावेश होता. वाढलेल्या महागाईच्या प्रश्नाकडे लक्ष वळवत आंदोलकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
तसेच मे महिना संपला तरी मागील महिन्यातील अन्नधान्य मिळाले नसल्याने महिला आक्रमक झाल्या होत्या.पुरवठा अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा धिक्कार करत नियमित धान्य देण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनामुळे गांधी पुतळा ते सुंदर भाग मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. आंदोलनस्थळी पोलीस उपस्थित नसल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली. सध्या काही रेशन दुकानात वाटपासाठी गहू आला आहे, तर काही ठिकाणी तांदूळ उपलब्ध नाही. अशा ठिकाणी उपलब्ध असेल ते रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना वाटप केले आहे. या दुकानदारांच्या भूमिकेला कारवाईचा इशारा व नोटीस दिल्याने उपलब्ध धान्यही नागरिकांना मिळत नाही. नागरिकांची सोय बघणार्या दुकानदारांवर कारवाई करू नये, अशी मागणी आंदोलकांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी अमित डोंगरे यांच्याकडे गेली. महिलांनी धान्य पुरवठ्याबाबत व्यथा मांडल्या. मागणीचे निवेदन डोंगरे यांनी स्वीकारले.
यावेळी धान्य पुरवठा होण्यास अडचणी भासत असून सुरळीत धान्य वाटपासाठी विलंब लागणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. येत्या पंधरा दिवसात महागाईचा बोजा कमी करून धान्य वाटप सुरळीत झाल्यास याप्रश्नी जिल्हा व्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा माकपच्या शिष्टमंडळाने दिला.
यावेळी ए. बी. पाटील, सदा मलाबादे, भरमा कांबळे, भाऊसाहेब कसबे, प्रकाश कारके, शिवगोंडा खोत, जीवन कोळी, धनाजी जाधव, पार्वती म्हेत्रे, सैफनबी शेख, आनंदा चव्हाण, प्रभाकर डोईफोडे, कुमार कागले, नूरमहंमद बेळकुडे यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.