सन 2022-23 आर्थिक वर्षासाठी 753 कोटी रुपयांचा वार्षिक नियत मंजूर
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.
प्रेस मीडिया लाईव्ह :
अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेली विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करुन त्यासाठी मंजूर केलेला निधी पूर्णपणे खर्ची पडेल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी सूचना राज्याचे #ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली.
सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे मंजूर करण्यात आलेला निधी आणि करावयाची विविध विकास कामे यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चालू वर्षी मंजूर निधी आणि मंजूर कामे यांचा आढावा घेताना पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे,आमदार लहू कानडे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार निलेश लंके, समिती सदस्य क्षितीज घुले पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यावेळी उपस्थित होते.
सर्व विभाग प्रमुखांनी मंजूर निधी वेळेतच खर्च होण्यासाठी कामांची तांत्रिक मान्यता, निविदा काढणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची तसेच योजनांना मंजूरी देताना विविध विभागांनी ताळमेळ ठेवण्याची दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
सन 2022-23 आर्थिक वर्षासाठी जिल्हयासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 453 कोटी 40 लक्ष रुपयांचा मर्यादेत 557 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 144 कोटी आणि आदिवासी उपयोजनेसाठी 47 कोटी 51 लक्ष रुपयांच्या मर्यादेत 52.52 कोटी असा एकूण 753 कोटी 52 लक्ष रुपयांचा नियत मंजूर करण्यात आला.
सन 2021-22 या वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या 510 कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च झाला, अनुसूचित जाती उपयोजनेच्या मंजूर 144 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी 99.8 टक्के खर्च झाला तर आदिवासी उपयोजनेसाठी मंजूर 46 कोटी रुपयांचा निधी 99.7 टक्के खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे यांनी प्रास्ताविकात जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला निधी आणि खर्चाची माहिती सादर केली. बैठकीला विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 साठी 64 कोटी 60 लक्ष रुपये मंजूर
सन 2022-23 या वर्षासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक 2 साठी 64 कोटी 60 लक्ष रुपये जिल्हा वार्षिक योजनेतून पूर्वनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 अंतर्गत रस्ते निवडीसाठी जिल्हा निवड समितीची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चालू वर्षी या योजनेंतर्गत 452 किमी चे रस्ते ग्रामीण भागात करण्यासाठी मंजूरी देण्यात आली.
'पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन' योजनेची लाभ पत्रांचे लाभार्थ्यांना वाटप
कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींना मदतीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शुभांरभ केलेल्या 'पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन' योजनेतील 44 लाभार्थ्यापैकी प्रातिनिधीक स्वरुपात 5 मुला-मुलींना लाभ पत्रांचे वाटप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आले.