समतेची चळवळ बलिष्ठ करणे हीच एन.डी.ना आदरांजली

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा ता.२६  आजन्म लोकशिक्षक असलेल्या प्रा.डॉ. एन.डी.पाटील सरांनी सहा - सात दशके शेतकरी कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढत उभे आयुष्य खर्च केले. उक्ती व कृतीत एकवाक्यता असणारे एन.डी.सर महाराष्ट्राच्या राजकारणाचा व समाजकारणाचा नैतिक धाक आणि अंकुश होते.सर्वांगीण समतेसाठी आयुष्य व्यतीत करणाऱ्या ज्या निवडक महान कृतिशील प्रज्ञावंतांची महाराष्ट्राला परंपरा आहे त्या परंपरेतील एन.डी.सर एक महत्वाचे विचारवंत नेते होते. चळवळ आणि प्रबोधन यासाठी नवा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यांचे विचार आणि कार्य आपण समजून घेऊन त्याआधारे वाटचाल केली तर सर्वार्थाने सक्षम महाराष्ट्र निर्माण होईल. त्यांच्या निधनानंतर येत असलेल्या महाराष्ट दिन व जागतिक कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारांवर आधारित समतेची चळवळ बलिष्ठ करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी  यांनी व्यक्त केले.ते रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय ,सातारा यांच्या वतीने अयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये समारोप करतांना बोलत होते.' प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासातील योगदान ' हा विषय होता. पहिल्या सत्रात प्रा.डॉ.भास्कर कदम यांनी मांडणी केली.महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने आयोजित या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे होते.स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.एस.एम.भोसले यांनी केले.

पहिल्या सत्रात बोलताना प्रा.डॉ.भास्कर कदम म्हणाले,कळत्या वयापासून एन.डी.सरांनी सातत्याने कष्टकरी,शेतकरी,कामगार,आदिवासी,वंचित घटकांची बाजू घेतली.त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटन,प्रबोधन, चळवळ,संघर्ष मार्गाने यशस्वी लढे दिले.एन.डी.सरांचे सामाजिक,राजकीय,आर्थिक,शैक्षणिक क्षेत्रांतील योगदान अनमोल स्वरुपाचे आहे.शेतकरी आंदोलन, शेतमालाला हमी भाव लढा,सेझ विरोधी लढा, शिक्षण बचाओ आंदोलन,साखर कारखान्याचा खाजगीकरण विरोधी लढा अशा अनेक आंदोलनातून एन.डी.सरांनी सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचे ऐतिहासिक स्वरूपाचे कार्य केले.

अध्यक्षस्थाना वरून बोलतांना प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे म्हणाले,एन.डी.सरांनी कर्मवीर अण्णांचे शैक्षणिक विचार रयत शिक्षण संस्थेत त्यांच्यानंतर  रुजविण्याचा अतिशय अतिशय मौलिक प्रयत्न केला.आणि रयतेला  सर्वार्थाने सक्षम करण्याचा प्रयत्न केला.त्यांचे शैक्षणिक,सामाजीक विचार नव्या पिढीला समजावेत या हेतूने या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले.प्रा.डॉ.भास्कर कदम आणि प्रसाद कुलकर्णी यांनी प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या विचार व  कार्याच्या सर्व पैलूंची सविस्तर व सूत्रबद्ध मांडणी केली. या वेबिनारमध्य महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते.आभार प्रा.डॉ.पी.के.टोणे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.जी.सी.खामकर यांनी केले.या वेबिनारचे समन्वयक म्हणून  प्रा.डॉ.एस.एम.भोसले,प्रा.डॉ.जयश्री आफळे,प्रा.डॉ.पी.के.टोणे, प्रा.जी.सी.खामकर,प्रा.रामचंद्र कवितके यांनी काम केले.

Post a Comment

Previous Post Next Post