प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली शहरासह परिसराला विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने चांगलेच झोडपले. वादळी वाऱयांमुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विद्युत तारांवर कोसळल्याने काही काळ विद्युतपुरवठा खंडित झाला होता.दिवसभराच्या उकाडय़ानंतर दुपारी पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला; परंतु वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले होते.
सांगली शहरात हनुमान जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी घातलेले मंडपदेखील कोसळले होते. सांगली शहरामध्ये दोन ठिकाणी गाडय़ांवर झाडे कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर एकूण 10 ते 15 ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून जिह्यातील काही तालुक्यांत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळी वाऱयांसह पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत दोघांचा जीव गेला आहे, तर शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. सांगली शहरात दोन दिवसांपासून पडणाऱया कडक उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली झाली होती. आज सकाळपासूनच शहरासह परिसरात उकाडा वाढला होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व गारांच्या पावसाने शहरासह परिसराला अक्षरशः झोडपून काढले. तब्बल एक तास वादळी वाऱयासह पाऊस सुरू होता. त्यामुळे काही ठिकाणी पत्रे उडून गेले. अचानक झालेल्या पावसामुळे बाजारपेठेतील किरकोळ विक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.