"पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या !
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहरांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून शहराच्या अनेक भागांमध्ये रहिवाशांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. यासाठी एकेका गृहनिर्माण सोसायट्यांना अक्षरश: दर महिन्याला लाखो रुपये मोजावे लागत आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात पुरवणे ही पुणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठीच पुणे महानगरपालिका नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करत असते.
असं असून देखील सध्या पुणे शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना टँकर माफियांकडून चढ्या दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पुणे महानगरपालिका सांगत आहे की, तब्बल 40 % पाणी गळती होत आहे. हे सरासर खोटे असून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असून हे पाणी टॅंकर माफियांच्या माध्यमातून प्रचंड मोठा नफा कमवून बांधकाम व्यावसायिक, इंडस्ट्री यांना पुरवले जात आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. *पाणी टंचाई आणि टँकर माफिया यांच्या विरोधात काल पुणे शहरातील शेकडो नागरिक व आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते यांनी बालगंधर्व चौकांमध्ये जोरदार आंदोलन करून पाणी टंचाई व टॅंकर लॉबीचा निषेध व्यक्त केला. यावेळी "आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या" अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार, डॉ अभिजित मोरे, सुदर्शन जगदाळे, आबासाहेब कांबळे, श्रीकांत आचार्य, मंजुषा नयन, प्रभाकर कोंढाळकर, किरण कद्रे, गणेश ढमाले, ज्योती ताकवले, वैशाली डोंगरे, आनंद अंकुश, शेखर धोत्रे, किरण कांबळे व शेकडो कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.*
"पुणे महानगरपालिका नागरिकांकडून पाणीपट्टी पूर्णपणे वसूल करत असताना नागरिकांनी पुन्हा टँकरचे पैसे का द्यायचे ? हा प्रश्न आजच्या या आंदोलनामध्ये अनेक रहिवाशांनी आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. महानगरपालिकेने आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्यावे आणि ते जर जमत नसेल तर टँकरचे पैसे द्यावे... टँकर विकत घेऊन पाणी पिणे हे आता नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. म्हणून 'पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या' अशी मागणी आम्ही करत आहोत", असे आम आदमी पक्ष नेते विजय कुंभार यांनी सांगितले.
https://youtu.be/70mvRSp6dpg
आमच्या यू ट्यूब चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा
खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या धरणांतून शहराला मुबलक पाणीपुरवठा होतो आणि दरडोई पाणीपुरवठा इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे असा सर्वसाधारण समज असला, तरी जमीनीवरील वास्तव याच्या अगदी उलट आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातील मोठ्या संख्येने गृहनिर्माण संस्थांकडून पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत शेजारील अनेक गावांचे विलीनीकरण केल्यामुळे, शहराचा विस्तार झपाट्याने झाला आणि दूरवरच्या भागात अनेक निवासी वसाहती निर्माण झाल्या आहेत. या भागात मागणीनुसार पुरेसा पाणीपुरवठा करण्यात पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) असमर्थतेमुळे पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. बालेवाडी, पाषाण, बाणेर, नऱ्हे, आंबेगाव, धायरी, कोंढवा, हडपसर, खराडी, विमाननगर व अहमदनगर रस्त्यावरील काही भागात व हौसिंग सोसायट्यांमध्ये वर्षभर पाण्याचे टँकर लागतात. शहराच्या विविध भागात टँकर भरण्यासाठी १० हून अधिक फिलिंग पॉइंट असून तिथे पुरेशी देखरेख, नियंत्रण नाही. बहुतांश पाण्याचे टॅंकर हे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे असल्यामुळे या टँकर लॉबीला राजकीय वरदहस्त आहे, असे आम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.
यापूर्वी, पाण्याच्या टँकरच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी पीएमसीने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) डिव्हाइस स्थापित करण्याचा प्रयत्न देखील अयशस्वी झाला होता. शहरातील टँकर लॉबीवर कोणतेही नियमन नाही. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणारे रहिवासी हे टँकर माफियांच्या दयेवर आहेत कारण टँकर लॉबीची राजकारणी आणि मनपा प्रशासनाशी हातमिळवणी आहे. टँकर लॉबीच्या पाण्याच्या दरावर अजिबात नियंत्रण नाही. टँकर चालक मागणीनुसार शुल्क आकारतात, उन्हाळ्यात खर्च वाढवतात. शहराच्या परिघावर राहणाऱ्या रहिवाशांना पाणीपुरवठ्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतात असे आम आदमी पक्षाचे आबासाहेब कांबळे यांनी सांगितले.
याबाबत महानगरपालिकेने कारवाई केली नाही आणि परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर आम आदमी पक्षातर्फे हे आंदोलन येत्या काळामध्ये अधिक तीव्र करण्यात येईल असे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी सांगितले.