कोपरा सभांनी 'आप' पिंजून काढणार पुणे शहर...

 विकासाचे दिल्ली मॉडेल आणि पुण्यातील नागरी समस्यांबाबत साधणार जनतेशी संवाद

खडकमाळ, मामलेदार कचेरी येथे कोपरा सभा घेऊन मोहिमेची सुरुवात.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : नागरिकांकडून वसूल केला जाणारा कर आणि त्या मोबदल्यात मिळणार्‍या सुविधा यावर जनजागृती मोहीम 'आप' तर्फे  राबविली जात आहे. यासाठी शहराच्या कानाकोपर्‍यात ठिकठिकाणी कोपरा सभा घेवून सामान्य जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. काल या मोहिमेची सुरुवात खडकमाळ, मामलेदार कचेरी येथून करण्यात आली. 


अनेक भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. पाणीपट्टी भरून ही नागरिकांना पैसे देवून पाणी विकत घ्यावे लागते. अनेक ठिकाणी कचरा व सांडपाण्याच्या नि:सारणाची योग्य व्यवस्था नाही. करोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात कामधंदे उध्वस्त झाले. त्यामुळे सर्वत्र पसरलेल्या बेरोजगारीवर अजून ही तोडगा निघालेला नाही; किंबहुना तशी काही चिंता ही प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आहे असे वाटत नाही. सामान्य जनतेचे लक्ष या मूळ समस्यांवरुन हटावे यासाठी  धार्मिक उन्माद इत्यादी भडकावू मुद्दे हुडकून काढून निरर्थक, सवंग राजकारण केले जात आहे. अश्या परिस्थितीत सामान्य माणूसच सामान्य माणसाच्या कामी धावून येत आहे.

आम आदमी पक्ष हीच भूमिका घेवून सामान्य जनतेमध्ये जात आहे. प्रत्येक प्रभागांत किमान 5 ते 10 कोपरा सभा घेतल्या जाणार आहेत. स्थानिक समस्यां खेरीज प्रचंड इंधन दरवाढ, घरगुती  कुकिंग गॅसचा हजाराच्या घरात पोहोचलेला दर, महागडी वीज हे सामान्य माणसाचे जगणे मुश्कील करून सोडणाऱ्या मुद्द्यांना या कोपरा सभाद्वारे ऐरणीवर घेतले जाणार आहे.

काल मामलेदार कचेरी, खडकमाळ आळी व मंडई भागात झालेल्या पहिल्या कोपरा सभेत 'आप' चे वाहतूक विंग राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य* यांनी महागाईच्या मुद्द्याला हात घालत येणार्‍या बिकट काळासाठी सजग राहुन सामान्य माणसांच्या जीवनाशी संबंधित बाबींबाबत अभ्यासपूर्ण उपाय योजना अंमलात आणण्याची क्षमता व  साफ नियत असणार्‍या आम आदमी पक्षासोबत उभे राहण्याचे आव्हान केले. 

तर या भागातील 'आप' चे युवा नेते पियुष हिंगणे यांनी या प्रभागातील स्थानिक समस्यांकडे लक्ष  वेधले.* या प्रसंगी प्रभागातील नागरिक व 'आप' चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्याच प्रकारच्या कोपरा सभा शहरातील सर्व प्रभागांत जास्तीत जास्त ठिकाणी आम आदमी पक्षातर्फे या नियोजित करण्यात आल्या आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post