प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या बांधकाम, अतिक्रमण परवाना व आकाशचिन्ह विभागाने धनकवडी येथील बालाजीनगर परिसर, एकता चौक, कात्रज-कोंढवा रस्ता, टिळेकर नगर ते येवलेवाडी रस्ता येथे कारवाई करीत अनधिकृत असलेल्या टपऱ्या, पत्राशेड, छोटी दुकाने रस्त्याच्या समोरील फ्रंट मार्जिन व साइड मार्जिन असे एकूण 9800 स्क्वेअर फुट क्षेत्रातील अतिक्रमण हटविले आहे .बालाजीनगर परिसरात दिलेल्या नोटीसनुसार स्वतःहून काढून घेतलेले अतिक्रमण क्षेत्रफळ अंदाजे एकूण 6100 स्क्वेअर फुट तर 3700 स्क्वेअर फुट अतिक्रमण जागेवरच काढण्यात आले. टिळेकर नगर, येवलेवाडी रस्ता, येथील नव्याने निर्माण होत असलेली अतिक्रमणे कारवाईमध्ये लोखंडी काउंटर व स्टिल काउंटर, सहा गॅस शेगडी, दोन शेड व 12 झोपड्या यावर कारवाई करण्यात आली.
महापालिका सहाय्यक आयुक्त ज्योती धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली, उपअभियंता प्रताप धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, बांधकाम निरीक्षक प्रशांत मोरे, बाळासाहेब बडदे, करण शिर्के, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक श्याम अवघडे, अतिक्रमण निरीक्षक शशिकांत टाक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक मंगेश तळपे आदी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. तसेच 4 पोलीस, 6 सुरक्षारक्षक, 9 बिगारी, कर्मचारी 35 असे परिमंडळ क्रमांक चार येथील मुख्य खात्यातील एकूण 64 कर्मचारी या कारवाईस उपस्थित होते.
पुणे महानगरपलिकेवर प्रशासकीय राज आल्यानंतर शहर तसेच उपनगरीय भागात अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. विशेषत: छोट्या दुकानदारांना टार्गेट केले जात असल्याचे अनेक व्यावसायिक तसेच व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. याबाबत आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे. अतिक्रमण कारवाईपूर्वी दुकानदारांना लेखी अथवा तोंडी सूचना द्याव्यात तसेच कारवाईपूर्वी दुकानातील साहित्य बाहेर काढण्यास वेळ द्यावा, अशी मागणी किरकोळ, छोट्या-मोठ्या दुकानदारांकडून केली जात आहे.