ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांचा पदभार तडकाफडकी काढून घेतला
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे –पुण्यातील किडनी तस्करी प्रकरण ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना अखेर भोवले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्याकडे तब्बल आठ वर्षांपासून असलेला रुग्णालयाचा अधीक्षक पदाचाही पदभार तडकाफडकी काढून घेतला आहे.तसेच, विभागीय प्रत्यारोपण समितीचे अधिकारही चौकशी पूर्ण होईपर्यंत काढून घेतले आहेत.
डॉ. तावरे हे ससून रुग्णालयाचे अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. किडनी तस्करीप्रकरणी आरोग्य विभागाने सुरूवातीला रूबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित केला. त्यापाठोपाठ वैद्यकिय शिक्षण विभागाने (डीएमईआर)देखील चौकशी समिती नियुक्त करत ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. सध्या अधीक्षक पदाचा तात्पुरता पदभार उपाधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे दिला आहे. तर, डॉ. तावरे हे त्यांच्या मूळ न्यायवैद्यक विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत असतील.
“डीएमईआर’चे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी बुधवारी ससून प्रशासनाला पत्र पाठवून डॉ. तावरे यांना अधीक्षक पदावरून कार्यमुक्त करावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. तावरे यांनी गुरूवारी सकाळीच पदभार सोडला. तसेच, नवीन अधीक्षक नियुक्त करण्याचे अधिकारही “डीएमईआर’ने स्वतःकडे राखीव ठेवले आहेत. ससूनच्या अधिष्ठाता यांना नवीन अधीक्षक पदासाठी पात्र असलेल्यांची नावे पाठवा असे सांगण्यात आले असून, विभागाकडूनच नवीन अधीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे.
कोल्हापूरच्या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यावर आरोग्य विभागात त्याचे प्रचंड पडसाद उमटले आहेत. संबंधित महिलेने आणि एजंटांनी बनवून दिलेले खोटी कागदपत्रे यांची सत्यता पडताळणी डॉ. तावरे अध्यक्ष असलेल्या विभागीय प्रत्यारोपण समितीने केली नसल्याचा ठपका या समितीवर ठेवला आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार डॉ. अजय तावरे यांचा अधीक्षक पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. पदभार काढण्याचे कारण आपल्या माहीत नसून, सध्या या पदाचा कार्यभार उपाधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे दिला आहे.
– डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
किडनी मान्यता समितीचे प्रकरण भोवले