मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचा आदेश धुडकावून लावला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक)
पुणे : गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यां विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षालाच फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. पुण्यामधील मुस्लीम पदाधिकार्यांनी राजीनामा दिल्यानंतर कल्याणमधील मनसे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी थेट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करताना समाजातील लोक आम्हाला जाब विचारत असल्याचे म्हटले आहे.
या मुद्यावरून मनसेत अंतर्गत नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नसल्याचे म्हणत राज ठाकरेंचा आदेश धुडकावून लावला. सोबतच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचे म्हणत भूमिकाही स्पष्ट केली.
आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. परंतु सध्या रमजान सुरू असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही. याचा अर्थ मी राज ठाकरे किंवा पक्षावर नाराज आहे, असा मुळीच नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.मशिदींवरील भोंगे काढले नाही तर हनुमान चालीसा लावणार असे राज ठाकरे म्हणाले आहेत. याचा अर्थ राज्य सरकारने मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे, असे मोरे म्हणाले.