अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अडीच तासा मध्ये आगीवर नियंत्रण मिळविले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कोंढवा बुद्रूक परिसरातील पारगेनगर मध्ये असलेल्या फर्निचर गोदामाला मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून पूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अडीच तासा मध्ये आगीवर नियंत्रण मिळविले. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.
या बाबत अग्निशमक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील पारगेनगर मध्ये फर्निचरचे मोठे गोदाम आहे. मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास गोदामातून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे स्थानिकांनी अग्निशमक दलाच्या जवानांनी माहिती दिली. काही वेळातच अग्निशमक दलाच्या 10 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली.
फर्निचरचे गोदाम मोठे असल्यामुळे आतील बाजूस आग वाढत होती. त्यामुळे आग विझविताना पाण्याचा मारा करताना जवानांना कसरत करावी लागत होती. अखेर दोन ते अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास पथकाला यश आले , गोदामाला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.