आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज पडली ?
प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे मनसे शहर उपाध्क्षपदाचा अझरुद्दीन सय्यद यांनी काल राजीनामा देऊन मनसेला धक्का दिला आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शोषल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा एक एक शब्द जणू हृदयाच्या अंतकरणातून काढला आहे की काय असे वाटू लागले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा 'जय महाराष्ट्र' !
खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं.मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भुमीका घेत असेल आणि स्वतःहा पक्षाध्यक्षच जर भुमीका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा 'जय महाराष्ट्र' म्हणण्याची वेळ आली आहे.बरं पक्षाध्यक्षांच्या भूमिकेला विरोध सोडा साधी नाराजी व्यक्त करायचा अधिकार नसावा..?वसंत तात्या मोरेंना उभा महाराष्ट्र ओळखतो,काय चुकलं त्यांचे..? फक्त पक्षाध्यक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली म्हणून त्यांना काय वागणूक दिली गेली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं.काय केलं नाही वसंतराव मोरे (तात्या ) यांनी या पक्षासाठी ते सांगा..? त्यांच्या सोबत जर तुम्ही असे वागत असाल तर आमचं तर न बोलेलंच बर .
ब्लु प्रिंट,विकासाच्या भव्य दिव्य गोष्टी एक दिवशी अचानक मस्जिदीवरील भोंगे आणि मदरस्यावर येऊन थांबतात तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येऊन जात.पक्ष स्थापन झाला तेंव्हा भूमिका होती की जातीपाती विरहित राजकारण करायचं.म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात होते आणि जीवतोड मेहनत देखील करत होते.पक्षाचा झेंडा देखील सर्वसमावेशक होता.राज साहेब ठाकरे म्हणजे आशेचा एक नवा किरण होते मात्र पाडव्याच्या सभेत वेगळंच काहीतरी पाहायला आणि ऐकायला मिळाले.
म्हणे मदरस्यात छापे मारा पहा काय काय मिळतय...
राज साहेब कित्येक गोरगरिबांच्या मुलांचे मी मदरस्यात प्रवेश करून दिलेत,आपल्या पक्षाच्या नावाने देणग्या देखील दिल्या.तिथे कधीच काही चुकीचं होत नाही आणि घडत देखील नाही . तुम्ही माझ्या सोबत चला मी दाखवतो तुम्हाला मदरसे काम काय चालते ते . कारण नसताना बदनामी का करता..?मुस्लिम द्वेषाच्या धंद्यांवर भाजपाच राजकारण चालतं. त्यांना मस्जिदच्या भोंग्या पासून त्रास होतो, मदरस्यानां बदमान करायचं काम त्यांचं आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज पडली ?
एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणं चुकीचं आहे.आणि त्या चुकीच्या गोष्टीत त्याच पीडित समाजाचा भाग म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वतःशीच बेईमानी करण्यासारख आहे.त्यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पुणे शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे .
वसंत तात्या सोबत जे झालं ते एक कार्यकर्ता म्हणून आणि एक नागरिक म्हणून देखील अजिबात पटणार नाहीये.फक्त पुणेच नाही तर उभ्या महाराष्ट्राला वसंत तात्या सोबत झालेल्या प्रकारच वाईट वाटलं आहे.वसंत मोरे म्हणजे सर्वसामान्य लोकांच काम करणारा आणि पक्षावर प्रचंड निष्ठा असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.मात्र त्यांना साधी नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नसावा हे किती दुर्दैवी आहे ! या मुळे मा.राज साहेबांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा 'जय महाराष्ट्र'~अझरुद्दीन सय्यद यांनी अशी आपली प्रतिक्रिया देत राजीनामा दिला आहे.