पुणे जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमाचा’ शुभारंभ

 सामाजिक न्याय विभागाकडून दहा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन   - सहायक आयुक्त संगीता डावखर यांची माहिती

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात आजपासून सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असून त्यानुसार जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी दिली आहे. 

6 ते 16 एप्रिल पर्यंत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यात आज या सामाजिक समता कार्यक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली. उद्या 7 एप्रिल रोजी विभागाच्या महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. 8 एप्रिल रोजी स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण, 9 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक योजना जनजागृती मेळावे, शैक्षणिक अस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.

10 एप्रिल रोजी समता दूतांमार्फत जिल्ह्यात लघुनाट्य, पथनाट्याच्या माध्यमातून विभागाच्या योजनांची प्रचार, प्रसिद्धी, 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करुन महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे, 12 एप्रिल रोजी मार्जिन मनी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन, 13 एप्रिल रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. 

14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करून व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरण करण्यात येईल. 

15 एप्रिल रोजी महिला मेळावे आयोजित करून बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणे, तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल. तर 16 एप्रिल रोजी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जात आहे, अशी माहितीही श्रीमती डावखर यांनी दिली.


प्रेस मीडिया लाईव्ह

 सह संपादक :  अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post