या मध्ये 11 दुय्यम निबंधकांचा समावेश , नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची पहिलीच वेळ
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक)
पुणे शहरात अनधिकृत इमारतींमधील सदनिका तसेच बेकायदा प्लॉटिंगची दस्त नोंदणी केल्या प्रकरणी शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागातील 44 अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करून घरचा रस्ता दाखविला आहे.या मध्ये 11 दुय्यम निबंधकांचा समावेश आहे. नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची पहिलीच वेळ आहे या मुळे नोंदणी व मुद्रांक विभागातील बेबंदशाहीला लगाम बसणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. शहरात रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी झाल्याबाबत तक्रारी राज्य शासनाकडे करण्यात आल्या होत्या.
त्यानुसार शहरातील 27 दुय्यम निबंधक कार्यालयांमधील मागील तीन वर्षांत नोंदविलेल्या सुमारे एक लाख दस्तांची तपासणी सुरु करण्यात आली होती. तपासणी पथक हे राज्य शासनाने नेमले होते. या तपासणीमध्ये काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नियमबाह्यपणे दस्तांची नोंदणी झाल्याचे दिसून आले आहे. रेरा कायद्याचे उल्लंघन करून तब्बल 10 हजार 561 दस्तनोंदणी केल्याचे आढळून आले आहे. हा तपासणी अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर शासनाने दोषी आढळणाऱ्या 44 अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नोंदणी व मुद्रांक विभागाला दिले. त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक यांनी ही कारवाई केली आहे.
राज्य शासनाने अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी करू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच संबधित बांधकाम प्रकल्पाची नोंदणी रेरा प्राधिकरणाकडे करुन रेरा क्रमांक दस्तामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा स्पष्ट सूचना असतानाही दुय्यम निबंधकांनी बेजाबदारपणे रेरा क्रमांक नसलेल्या बांधकाम प्रकल्पांमधील दस्तांची नोंदणी केली. जमिनीचे तुकडे पाडून त्याची विक्री करण्यास मनाई असताना देखील एक-एक गुंठ्यांची दस्त नोंदणी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दुय्यम निबंधकांचे हे कारनामे खुद्द महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी चौकशीचे आदेश देऊन त्यानंतर निलंबनाची कारवाई करणाचे आदेश दिले.
दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदविण्यात आलेल्या दस्तांची या पथकाने बारकाईने पाहणी केली. यामध्ये बांधकाम प्रकल्पातील सदनिका अथवा दुकाने यांची नोंदणी करतेवेळी दस्तामध्ये 'रेरा' क्रमांक नमुद आहे का? बांधकाम प्रकल्पाला मंजुरी आहे का, याचसह जमिनीचे तुकडे करून विक्री केली आहे का, याची तपासणी केली. यामध्ये नियमबाह्यपणे दस्तनोंदणी केल्याचे आढळून आले.