महाराष्ट्राच्या राजकारणात "नागाचा फणा", "कोंबडी" आणि "म्हैस" धुमाकूळ घालताना दिसत आहेत..!

महाराष्ट्राचे राजकारण माणसे चालवतात की प्राणी..?


प्रेस मीडिया लाईव्ह :

अनवरअली शेख : (सह संपादक )

गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेला पडला आहे की महाराष्ट्राचे राजकारण माणसे चालवतात की प्राणी..? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षांपासून "पेंग्विन" धुमाकूळ घालतो आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात "म्याऊ म्याऊने" धुमाकूळ घातला होता. त्याला "कोंबड्याचे" प्रत्युत्तर मिळाले आणि आता त्या पलिकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात "नागाचा फणा", "कोंबडी" आणि "म्हैस" धुमाकूळ घालताना दिसत आहेत..! 

एरवी महाराष्ट्राचे राजकारण सभ्य सुसंस्कृत असल्याचा टेंभा मिरवणारे सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांना मात्र वर उल्लेख केलेल्या शेलक्या शब्दांमध्ये चिखलफेक करताना दिसत आहेत.पूर्वी शेलके शब्द किंवा शिव्या हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे "सार्वजनिक पेटंट" होते. त्यांच्या तोंडी अनेकदा "शिव्या" या "ओव्या" बनून यायच्या. कसलेले व्यंगचित्रकार असल्यामुळे त्यांनी आपल्या विरोधी नेत्यांना वापरलेली विशेषणे शोभून दिसायची. शरद पवारांना ते "मैद्याचे पोते" आणि "बारामतीचा म्हमद्या" म्हणायचे.!! पवार देखील ही बाळासाहेबांची परतफेड तितक्याच ग्रामीण शैलीने करायचे.पण हे झाले दोन दिग्गज नेत्यांचे. आता मात्र महाराष्ट्रात त्यांचे अनुयायी म्हणवणारे नेते एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. संजय राऊत रोज शिव्यांचा शब्दकोशच पत्रकार परिषदेत शेजारी घेऊन बसत असल्यासारखे वाटताहेत. "भडवा", "चुत्या" "येडझवा" हे शब्द संजय राऊत यांच्या चिडलेल्या तोंडी येत आहेत आणि ही "ठाकरी भाषा" असल्याचा दावा ते करत आहेत.

पण जे बाळासाहेबांना शोभायचे, ते संजय लावताना शोभतेच असे नाही. तसेच आदित्य ठाकरे यांना उद्देशून "पेंग्विन" असे डिवचले जाते. पेंग्विन हा त्यांचा आवडता पक्षी त्यांना राजकीयदृष्ट्या कायमचा चिकटला आहे.पण त्याचबरोबर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्यांच्याकडे बघून "म्याऊ म्याऊ" केले. शिवसेनेचा वाघ मांजरीचा रूपांतरित झाल्याचे ते सूचन होते. सुरुवातीला आदित्य ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, पण नवाब मलिक यांनी तुरुंगात जाण्यापूर्वी "म्याऊ म्याऊ"चा विषय पुन्हा उकरून काढला. नारायण राणे यांचे "कोंबडा" स्वरूपातले चित्र ट्विट करून "पहचान कौन?" असे कॅप्शन दिले. त्यामुळे "पेंग्विन", "म्याऊ म्याऊ" विरुद्ध "कोंबडा" असे युद्ध मध्यंतरी महाराष्ट्रात रंगले.आता युद्धाने पुढची पायरी गाठली आहे. राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना "नागाचा फणा" असे म्हणून डिवचले आहे. आव्हाडांनी "कोंबडीचा कोणता भाग" असे सांगून राज ठाकरेंना डिवचले आहे. त्यावर ठाण्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शरद पवारांना उद्देशुन "म्हशीचा कोणता भाग" असे शरसंधान साधले आहे. वर आम्हाला शरद पवारांविषयी आदर आहे. आम्ही सभ्य आहोत म्हणून कोणाचा चेहरा "म्हशीचा कोणता भाग" दिसतो, हे आम्ही सांगणार नाही, अशी मखलाशी जाधव यांनी केली आहे.

एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाचे डावपेच जरी विविध पक्षांमधली माणसे खेळत असली तरी त्यात "पेंग्विन", "म्याऊ म्याऊ", "कोंबडा", "नागाचा फणा", "कोंबडी" आणि "म्हैस" यांची सध्या चलती असलेले दिसत आहे.!!

Post a Comment

Previous Post Next Post