प्रेस मीडिया लाईव्ह :
पिपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली आहे. व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाकडून एक परिपत्रक काढण्यात आलं असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कृष्णप्रकाश यांच्यासोबत नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे याचीही राज्याचे महिला अत्याचार प्रतिबंधक विभागामध्ये महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
राज्यातील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली व्हीआयपी सुरक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी आता अंकुश शिंदे पदभार घेणार आहेत. अंकुश शिंदे हे यापूर्वी सुधार सेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर होते.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली होती. दिवसाढवळ्या बंदुक आणि तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडांचा सुळसुळाट झाला होता. त्या विरोधात कृष्णप्रकाश यांनी कडक भूमिका घेतली होती, तरीही या घटनांवर पोलिसांना नियंत्रण ठेवण्यास अपयश आल्याची चर्चा होती. त्यामुळे आता कृष्ण प्रकाश यांची बदली झाल्याची चर्चा सुरू आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. दीपक पांडे आता महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार आहे. जयंत नाईकनवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे. लेटरबॉम्ब आणि वेगवेगळ्या आदेशांमुळे पांडे हे कायम चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी पांडे यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला होता.