प्रेस मीडिया लाईव्ह :
नाशिक : होली क्रॉस चर्च मध्ये झालेली इफ्तार पार्टी समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. सर्वधर्मीय बांधवांनी या ठिकाणी एकत्र येत केवळ रोजा इफ्तार केला नाही, तर चर्चमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत 'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना, हिंदी हैं हम हिंदुस्तान हमारा' वाक्याचा प्रत्यय आणून देत सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडवून आणले.
त्र्यंबक सिग्नल येथील हॉली क्रॉस चर्चमध्ये रमजाननिमित्त बुधवारी (ता.२०) सायंकाळी एम्स चॅरिटेबल ट्रस्ट आणि आम्ही नाशिक संविधान प्रेमी यांच्यातर्फे बंधुभाव इफ्तार मिलन-२०२२' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन यासह विविध धर्माचे बांधव एकत्र आले होते.
सर्वांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने रोजा इफ्तार केला. सायंकाळी नमाजला जास्त वेळ नसल्याने उपस्थित मुस्लिम बांधवांना मशिदीत जाणे शक्य नव्हते. अशा वेळेस त्यांनी चर्चमध्ये असलेली एखादी खोली नमाजासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती चर्चचे फादर यांना केली. सर्वधर्मसमभाव आहे मग खोली कशाला सरळ चर्चमध्ये नमाज पठण करा, असे म्हणत त्यांनी चर्चमध्ये नमाजची व्यवस्था करून दिली.
मुस्लिम बांधवांनी चर्चमध्ये नमाज पठण केली. धार्मिक सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही इफ्तार पार्टी ठरली. मुस्लिम बांधव नमाज पठण करत असताना त्या ठिकाणी देव देवता, अल्ला, प्रभू येशू तसेच अन्य समाजाचे देव-देवता यांचे प्रत्यक्ष वास्तव्य चर्चमध्ये आल्याचा अनुभव अनुभवास मिळाला, अशा प्रतिक्रिया उपस्थितांकडून देण्यात आल्या. सध्याच्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दूषित वातावरणात अशाप्रकारे एकतेचा संदेश देणारी ही इफ्तार पार्टी समाजकंटकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली.
विविधतेतून भारत देश नटलेला आहे. त्यामुळे सर्वांनी एकतेची भावना मनात ठेवून वावरावे, अशा प्रकारचा संदेशदेखील उपस्थित सर्वधर्मीय बांधवांनी दिला.