प्रेस मीडिया लाईव्ह :
नाशिक : मशिदीवरील भोंगे काढावेत यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे हा अल्टीमेटम दिला आहे. त्याआधीच या संदर्भात नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आदेश काढला आहे.भोंगे लावण्याच्या नावाखाली कुणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास चार महिने तुरुंगवास किंवा थेट हद्दपारी करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे.
मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यात धार्मिक वातावरण तापले आहे. धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी रविवारी रात्री उशिरा याविषयी धार्मिक प्रथा, परंपरा, रीतिरिवाज आणि कायदा सुव्यवस्था यांचा विचार करीत सुस्पष्ट, असे आदेश काढले आहेत. भोंगे लावण्याच्या नावाखाली कुणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याची तरतूद असलेला हा आदेश आहे.
राज्यात प्रथमच श्रीरामाची नगरी म्हटल्या जाणाऱ्या नाशिकलाच असा आदेश काढण्यात आला. हा आदेश राज्यासाठी हा आदेश पथदर्शी ठरणार आहे. दरम्यान, असे असले तरी हनुमान चालिसा म्हणू इच्छिणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी प्रतिबंध न करता मंगळवार पर्यंत पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी मागताना विद्यमान मशिदीपासून १०० मीटर दूर अंतरावर आणि तेही मुस्लिम समाजाच्या पारंपरिक पाच वेळच्या नमाजच्या वेळेत हनुमान चालिसा म्हणण्यास परवानगी नसेल. नमाज नंतर किंवा आधी १५ मिनिटे परवानगी घ्यावी लागणार आहे.
दुसरे विशेष म्हणजे, भोंगे लावून नमाज म्हणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रचलित ध्वनिप्रदूषणविषयक नियम पाळावे लागणार आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तांच्या भोंगेविषयक आदेशाबाबत कुणाला हरकत असल्यास पोलिस आयुक्त पांडे यांनी न्यायालयात दाद मागून आदेश आणल्यास पोलिस त्यानुसार कार्यवाही करतील, इतके स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळेच नाशिक पोलिस आयुक्तांनी धार्मिक प्रथा, परंपरा, कायदा सुव्यवस्था, धार्मिक तेढ आणि ध्वनिप्रदूषणविषयक नियमांचा सारासार विचार निर्गमित केलेले आदेश नाशिकसोबत राज्यासाठी पथदर्शी ठरू शकतात.
काय आहेत आदेश.....
- मशिदीपासून शंभर मीटरच्या आत पाच वेळच्या नमाजच्या वेळेत कुणालाही भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणता येणार नाही
- ज्यांना शंभर मीटर दूर अंतरावर म्हणायचे असेल त्यांना ३ मेपर्यंत परवानगी घ्यावी लागणार
- ध्वनिप्रदूषणविषयक नियमांचे पालन करूनच हनुमान चालिसा किंवा नमाजपठण करावे लागणार
(औद्योगिक क्षेत्रासाठी ७० ते ७५ डेसिबल, व्यावसायिक क्षेत्र ५५ ते ६५, निवासी क्षेत्र ४५ ते ५५, न्यायालय, रुग्णालय, शासकीय कार्यालय आणि शाळा असलेल्या शांतता झोनमध्ये ४० ते ५० डेसिबल.)