शिरोळ तालुक्यातील अपुऱ्या नळ पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्ण होणार.... नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आदेश

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई-  शिरोळ तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नळपाणीपुरवठा योजनांसंबंधी एक बैठक  गुलाबराव पाटील मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नामदार गुलाबराव पाटील यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय पेयजल मिशन, मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना अशा अनेक योजनांमधून हाती घेण्यात आलेल्या दत्तवाड, गणेशवाडी मरजेवाडी, कोंडीग्रे, जैनापूर, आलास , शिरदवाड, शिवनाकवाडी या गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून रखडलेल्या आहेत. अनेक योजनांची कामे 80% पुर्ण होऊन सुद्धा त्या पूर्णत्वास न गेल्यामुळे या भागातील नागरिकांना पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत होते. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी याबाबतीत स्वतः लक्ष घातले आणि नामदार गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री यांचे माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात घेण्यासाठी आग्रह धरला होता, याचाच भाग म्हणून ही बैठक संपन्न झाली, बुधवारी झालेल्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्थानिक कार्यकारी अभियंता  अशोक ढोंगे यांना सर्व कामांबाबत सूचना दिल्या आणि अपुऱ्या नळपाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात सर्व ती कार्यवाही करावे असे आदेश दिले असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे,बैठकीमध्ये सर्व योजनांची राहिलेली कामे विभागामार्फत करणे,दोषी कंत्राटदार यांना काळ्या यादीत टाकणे, 30 एप्रिल 2022 पर्यंत सर्व कामकाजाना प्रशासकीय मान्यता घेणे 

निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 में 2022 ला वर्क ऑर्डर देणे, या सर्व कामकाजाची टप्पेनिहाय माहिती राज्यमंत्री यड्रावकर यानां देणे अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी उपस्थित पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजीव जयस्वाल, सदस्य सचिव महाराष्ट्र तसेच जीवन प्राधिकरणचे अभिषेक कृष्णा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत कामे पूर्ण करण्याबाबत सक्त ताकीद दिली, कोंडीग्रे, जैनापूर, आलास आदी गावांमधील योजनांमध्ये वनहक्क कायद्यानुसार परवानगी घेण्यासाठी स्थानिक स्तरावर वनहक्क समितीकडून उचित कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिल्या. यासंदर्भात राज्यमंत्री यड्रावकर यांनी सदर कार्यवाही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनशी संबंधित असल्याने ग्रामपंचायतीकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली. 

आज झालेल्या बैठकीमुळे वर नमूद सर्व पाणीपुरवठा योजना लवकरचपूर्ण होऊन या सर्व गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी सुरळीत उपलब्ध होईल. मतदारसंघात मुबलक पाणी उपलब्ध असूनही घरापर्यंत पाणी जात नसल्याची खंत जनतेच्या मनात होती. ही खंत जाणून  राज्यमंत्री यड्रावकर  यांनी या योजना कोणत्याही परिस्थितीत तातडीने पूर्ण झाल्या पाहिजेत अशी आग्रही भूमिका घेतली होती. आता ह्या योजना पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..

Post a Comment

Previous Post Next Post