सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्याही झळा
लिंबाचे दर हे 300 ते 350 रुपये किलो
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : उन्हाच्या वाढत्या झळाबरोबर सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्याही झळा सहन कराव्या लागत आहेत. रोजच्या जीवनात लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. मात्र ,गेल्या 13 दिवसातील इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम हा भाजी पाल्याच्या दरावर झालेला आहे. अनेक भागात केवळ शेतामालाच्या वाहतूकीचा खर्च वाढला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना नाही तर विक्रेत्यांना होताना पाहवयास मिळत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याचा सर्वाधिक परिणाम मिरची आणि लिंबावर दिसून येत आहे. गुजरातमध्ये एका लिंबाची किंमत ही चक्क 18 ते 20 रुपयांपर्यंत पोहचलेली आहे. ठोक बाजारात 300 रुपये किलोने विक्री होत आहे तर यापेक्षा अधिक किंमतीमध्ये जोधपूर, वस्त्रापूर येथे विक्री होत आहे. याच तुलनेत महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेत लिंबू 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. वाढत्या इंधनाबरोबरच उन्हाच्या झळामुळे लिंबाच्या मागणीत झालेली वाढ आहे. देशाच्या राजधानीत मात्र, लिंबाचे दर हे 300 ते 350 रुपये किलो असे आहेत. म्हणजेच एक लिंबू घेण्यासाठी 10 रुपये मोजावे लागत आहेत.
लिंबाच्या मागणीत वाढ..
गुजरात, दिल्ली, हैदराबाद, कर्नाटकाच्या तुलेनेत महाराष्ट्रात भाजीपाल्याचे दर हे नियंत्रणात आहे. शेतकरी ते बाजारपेठेच्या अंतरावरुनही भाजीपाल्याचे दर ठरत आहेत. उत्पादकता कमी-जास्त यावर भाजीपाल्याचे दर नाहीत तर गेल्या 13 दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे दर गगणाला भिडले आहेत. गुजरातमध्ये एक लिबू 18 ते 25 रुपयाला तर दिल्लीत तेच लिंबू 10 ते 12 रुपयाला आहे. उन्हाळ्यात लिंबाच्या मागणीत वाढ झाली तरी महाराष्ट्रीतील मुख्य बाजारपेठेत 8 ते 10 रुपयाला एक लिंबू पडत आहे. मात्र, इंधन दरवाढीचा अधिकचा परिणाम होत आहे.
महाराष्ट्रातील भाजीपाल्याचे दर...
यंदा प्रथमच लिंबाला विक्रमी दर मिळालेला आहे. आवक घटल्याने लिंबाचे दर थेट 250 रुपयांवर गेले आहे. तर पुणे मार्केट कमिटीमध्ये 15 किलोची एक गोणी ही 250 ते 500 पर्यंत विकली जात आहे. तर आवक ही केवळ 700 ते 800 गोण्यांची होत आहे. ही लिंबाची अवस्था असली तरी महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेत कांदा 7 ते 10 रुपये किलो, बटाटा 12 ते 16 रुपये किलो, हिरवी मिरची 60 ते 70 रुपये किलो, कारले 20 ते 22 रुपये किलो, वांगी 15 ते 30 रुपये किलो, ढोबळी मिरची 25 ते 30 रुपये किलो असे ठोक बाजारातले दर आहेत. इतर राज्याच्या तुलनेत हे दर नियंत्रणात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतीमाल वाहतूकीचे दर वाढले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदीच्या किंमतीमध्ये देखील वाढ होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या किंमतीमुळे पाहिजे त्या प्रमाणात भाजीपाल्याची विक्री होत नाही. २२ मार्चपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ झाल्याचा हा परिणाम आहे. हे कमी म्हणून की काय वातावरणातील बदलामुळे लिंबाच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. उत्पादन घटल्यामुळे लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. दक्षिण भारतात गेल्या दीड महिन्यात हिरव्या मिरचीचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मिरचीचेही दर वाढत आहेत.