प्रेस मीडिया लाईव्ह :
आपली कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे, असं सांगत किरीट सोमय्या यांनी 'विक्रांत बचाव मोहीम' भ्रष्टाचारप्रकरणी बचाव करण्याचा प्रयत्न आज केला.त्यावर पत्रकारांनी किक्रांतसाठी तुम्ही किती पैसे जमवले आणि त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न करताच तोंडाला कुलूप लावत अवघ्या दोन मिनिटांत पत्रकार परिषदेतून पळ काढला.
त्यानंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रश्नी शेतकऱयांना घेऊन मुंबईतील 'ईडी' कार्यालयात गेलेल्या सोमय्यांना पत्रकारांनी पुन्हा गाठत 'विक्रांत वाचवा'च्या नावाखाली किती पैसे गोळा केले, अशी विचारणा करताच कोणतेही उत्तर न देता सोमय्यांनी तिथूनही काढता पाय घेतला.
विक्रांत या युद्धनौकेच्या डागडुजीसाठी निधी देण्याचे आवाहन करीत जवळपास 57 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सोमय्या यांच्या विरोधात माजी सैनिक बबन भोसले यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या, नील सोमय्या व अन्य साथीदारांविरोधात भादंवि कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र व देशातील अन्य काही ठिकाणी किरीट सोमय्यांच्या विरुद्ध फसवणूक आणि अफरातफरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात सोमय्या यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.