मनसेतच राहणार असल्याचे मोरे यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले
मुंबई । मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याबाबत निर्माण झालेला वाद आता संपला आहे.वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून मी या भेटीनंतर पूर्णपणे समाधानी आहे.मी यापुर्वीही मनसेतच होतो आणि नंतरही मनसेतच राहणार असल्याचे मोरे यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यादिवशी घेतलेल्या सभेत कटटर हिंदुत्वाची भूमिका घेतली होती.मशिदींवरील अजानसाठीचे भोंगे जर सरकारने काढले नाहीत तर आम्ही मशिदींसमोर हनुमानचालिसा पठण करू असा इशारा त्यांनी दिला होता.वसंत मोरे हे नगरसेवक देखील आहेत.पुण्यातील त्यांच्या मतदारसंघात मोठया प्रमाणात मुस्लिम मतदार आहेत.आपण त्यांच्या कायम अडीअडचणीला धावून जात असतो मग त्यांच्या प्रार्थनेला कसा विरोध करणार असा सवाल करत वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला छेद जाईल अशी भूमिका घेतली होती.त्यानंतर वसंत मोरे यांची पदावरून हकालपटटी झाली होती.
दरम्यानच्या काळात मोरे यांनी राज यांची भेट घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला मात्र त्यांना त्यात यश येत नव्हते.राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या पक्षांकडून मोरे यांना पक्षप्रवेशाच्या ऑफरही आल्या होत्या.अखेर सोमवारी मोरे यांना शिवतीर्थावर भेटीचे आमंत्रण आले.राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली.तुला माझा डायरेक्ट ॲक्सेस आहे.मग माझयाशी न बोलता तू थेट माध्यमांना का प्रतिक्रिया दिलीस असा सवाल राज यांनी मोरे यांना केल्याचे समजते.राज यांची मंगळवारी ठाण्यात उत्तरसभा आहे.या सभेत तुला तुझया सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असेही राज ठाकरे मोरे यांना म्हणाले.