हल्ला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन
प्रेस मीडिया लाईव्ह :
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्य गुप्तचर यंत्रणेवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. एसटी कामगारांनी केलेला हल्ला नियोजनबद्ध होता. मात्र पोलिसांना त्याची काहीच माहिती नव्हती.सुरक्षेतील या त्रुटींची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि त्यांनी तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस आयुक्त संजय पांडे यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. गृहमंत्र्यांनी नंतर शरद पवार यांचीही भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी परिमंडळ दोनचे उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांची तातडीने बदली करण्यात आली आणि आयपीएस निलोत्पल यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली. तसेच हल्ला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
या भेटीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या हल्ल्याप्रकरणी संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल. कायदा व सुव्यस्थेमध्ये त्रुटी दिसून आल्या आहेत. जे जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. या हल्ल्याच्या घटनेनंतर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या हल्ल्यास कोण जबाबदार आहे त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी व पुढे काय करायचे यासंदर्भातही चर्चा केली. याबाबतची चौकशी करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपने सदावर्ते नावाचा नवा नेता निर्माण केला आहे. त्याला संपूर्ण पाठबळ भाजपचे आहे. तो कुठे राहतो, कोणाच्या घरात राहतो, त्याला आर्थिक पाठबळ कोणाचे आहे आणि त्यांना महाविकास आघाडी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या विरुद्ध गरळ ओकण्यासाठी अर्थपुरवठा केला जातो. कालचा हल्ला हा त्यातलाच एक भाग होता हे सिद्ध झाले आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली. ते म्हणाले की, या हल्ल्यापूर्वी पत्रकारांना दुपारी अडीच वाजताच मेसेज आले होते, तर मग पोलीस काय करीत होते. एवढय़ा मोठय़ा नेत्याच्या घरी लोक नियोजनबद्ध हल्ला करतात आणि पोलिसांना त्याची कल्पना मिळत नाही हे पोलिसांचे मोठे अपयश आहे. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे एवढे अपयश कसे असू शकते याची खरी चौकशी झाली झाली पाहिजे. कॅमेरामन पोहोचू शकतात, पण पोलीस उशिराने कसे पोहोचतात? कालचे दृश्य अतिशय भयावह होते. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.
पवार कुटुंबीय तसेच सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या पीएसयूवर असेल. मुंबई पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी त्यांच्या सुरक्षेत तैनात असतील. 'सिल्व्हर ओक' तसेच बारामतीमधील 'गोविंदबाग' येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर पोलीस अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे कबूल केले. ते म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेण्याचे पोलिसांचे काम असते. त्यामध्ये पोलीस कमी पडले हे निर्विवाद सत्य आहे. कारण आंदोलक जेव्हा शरद पवार यांच्या घरी आले तेव्हा त्यांच्या मागोमाग मीडियाचे पॅमेरेही आले. मीडियाचे कॅमेरे जेव्हा येतात, याचा अर्थ मीडियाने माहिती घेतली होती. पण जर मीडियाने शोधून काढले तर मग पोलीस यंत्रणेच्या संबंधित विभागाला का शोधता आले नाही? त्याच्याही संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱयाची चौकशी सुरू आहे. यातील वस्तुस्थिती पुढे येईल.