परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे खोटे असल्याचं नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली

 मुंबई :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या लेटरबॉम्बची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चांदीवाल कमिशनचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.त्यामध्ये परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे खोटे असल्याचं नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


राज्याच्या गृहमंत्र्यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्याची माहिती आहे. त्यामध्ये परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे चुकीचे असल्याचं नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप करताना त्यांनी 100 कोटी रुपये वसुलीचा आदेश देण्यात आल्याचं सांगितलं होतं.चांदीवाल कमिशनने या सर्व आरोपांची चौकशी करताना अनेक पुरावे तपासले होते. तसेच अनेक साक्षीदार तपासले होते. या अहवालानंतर अनिल देशमुखांना एक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 20 मार्च 2020 रोजी एक पत्र लिहून मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा 100 कोटींची वसूली करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोप करत एक लेटरबॉम्ब फोडला होता. देशमुखांनी हे काम पोलीस निरीक्षक सचिन वाझेकडे सोपवल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. या राजकीय भूकंपानंतर देशमुखांवर चोहोबाजूनं टीका करण्यात आली. त्यातच देशमुखांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला. मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशीआयोगाची स्थापना करत याची समांतर चौकशी सुकी केली. परमबीर सिंह यांनी कोणत्या आधारे आरोप केलेत?, त्याबाबत त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का?, देशमुख आणि इतर सह आरोपींनी या आर्थिक व्यवहारांबाबत काही खुलासे केले आहेत का? याची चौकशी हा आयोग करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post