प्रेस मीडिया लाईव्ह :
मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करून त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता जप्त केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 'ईडी'ला फटकारत देशमुख कुटुंबीयांची जप्त केलेली मालमत्ता तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावरून 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात ईडी व सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू आहे. योगेश देशमुख आणि शीतल देशमुख यांच्या वैयक्तिक 11 मालमत्ता 'ईडी'ने जप्त केल्या होत्या. त्याप्रकरणी सर्वेच्च न्यायालयाने ईडीला फटकार लगावत मालमत्ता मुक्त करण्यास सांगितले असल्याची माहिती अनिल देशमुख यांचे वकील विपुल अग्रवाल यांनी दिली.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपावरून 'ईडी'ने देशमुख कुटुंबीयांची जप्त केलेली मालमत्ता ही 180 दिवसानंतरची कारवाई आहे. कायद्यानुसार अशा प्रकारे 180 दिवसांच्या नंतर मालमत्ता जप्त करता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अनिल देशमुख यांचा मुलगा योगेश आणि सून शीतल यांच्या नावे असणाऱ्या जप्त केलेल्या मालमत्ता 'ईडी'ला परत कराव्या लागणार आहेत.