परवानगी न घेता लावण्यात येणार्या लाऊड स्पीकरवर कडक कारवाई करण्यात येणार
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : मुंबई पोलिसांनी बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांनी शहरात रात्री 10 ते सकाळी 6 च्या दरम्यान भोंगे अथवा लाऊड स्पीकर लावण्यास बंदी घातली आहे. इतकेच नाही, तर यापुढे कुठल्याही कार्यक्रमासाठी किंवा धार्मिक स्थळांवर भोंगे अथवा लाऊड स्पीकर लावण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी न घेता लावण्यात येणार्या लाऊड स्पीकरवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तर अवैध आणि सायलेंट झोनमधील धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकर्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेशही मुंबई पोलिसांनी निर्गमित केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी दिलेल्या आदेशाची मुंबई पोलिसांकडून आता सक्त अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक टीमही तयार केली आहे. एखाद्या भागात रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान भोंगे/ लाऊड स्पीकर लावल्याचा कंट्रोल रूमला कॉल आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सोबतच, मुंबई पोलिसांनी समाजविघातक कृत्ये, जातीय चिथावणी आदी कामात गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. भादंवि कलम 144, 149 आणि 151 इत्यादी अंतर्गत समाजविघातक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा विचार केला जात आहे. काही लोकांना आधीच यासंबंधित नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांचे नेमके निर्देश काय आहेत...
-रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत लाऊड स्पीकरवर पूर्ण बंदी
-ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र टीम
-कंट्रोल रूमला फोन आल्यास कारवाई
-सायलेंट झोनमध्ये लाऊड स्पीकर लावण्यास मनाई
-अवैध बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकर लावण्यास परवानगी नसेल
-प्रक्षोभक, समाजात तेढ निर्माण करणारे भाषण करणार्याविरोधात कारवाई होणार