प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्यांवर केलेल्या खंडणी वसुलीच्या आरोपांची मुंबई पोलिसांच्या एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी येथे दिली.आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीला हवा तितका वेळ दिला जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले .
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. या आरोपानंतरही गृहखात्याकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. संजय राऊत यांनी गृहखात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वळसे-पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत ईडीच्या अधिकार्यांची चौकशी करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार वळसे-पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चौकशीच्या निर्णयाची माहिती दिली.
ईडीच्या अधिकार्यांवर झालेल्या आरोपांची चौकशी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी करेल. त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल. आधी उपायुक्त दर्जाचा अधिकारी ही चौकशी करत होते. पण याप्रकरणी आर्थिक गुन्हा नसून हे खंडणीचे प्रकरण असल्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाला वर्ग करण्यात आली आहे. प्रभू यांच्यासह विविध क्षेत्रांत तपासाचा अनुभव असलेले अधिकारी या विशेष पथकात आहेत. या प्रकरणाच्या हस्तांतराची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाली असून लवकरच तक्रारदारासह इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.
अलीकडच्या काळामध्ये प्रक्षोभक भाषणे करून समाजामध्ये तेढ आणि संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब राज्याच्या आणि देशाच्या एकतेच्या दृष्टीने बरोबर नाही. मशिदीवरील भोंगे उतरवणे हा भाजपचा अजेंडा आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात आहे. पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. मशिदीसमोर लाऊड स्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याच्या प्रकरणावरून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना पोलीस प्रशासन करेल, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.