सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी 30 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला
प्रेस मीडिया लाईव्ह :
महागाईच्या झळा आता आणखीन तीव्र होणार आहेत येत्या एक मे पासून केस कापणे, दाढी करणे महाग होणार आहे. सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी 30 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांपासून महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कच्च्या मालाच्या दरासह इंधन दरातही वाढ झाली आहे. दररोज वाढत असलेल्या महागाईमुळे दरवाढ करण्याची मागणी सलून व्यावसायिकांकडून करण्यात येत होती. असोसिएशनचे 52000 सलून व ब्यूटी पार्लर चालक सदस्य आहेत. अखेर सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांच्या ऑनलाइन बैठकीत 30 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दरवाढ शहरी आणि ग्रामीण भागांसाठी लागू असणार आहे. ही दरवाढ 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनापासून लागू होणार आहे.
विविध प्रकारच्या वाढत्या महागाईमुळे दरवाढ करण्यात आली. सलून अॅण्ड ब्युटी पार्लरसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याशिवाय इतर घटकांमध्येही दरवाढ झाली असल्याने कमी दरात ग्राहकांना सेवा पुरवणे व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. त्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनीदेखील दरवाढीला सहकार्य करावे असे आवाहन सलून अॅण्ड ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष आणि नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी केले आहे. या दरवाढीमुळे महागाईत होरपळणाऱ्या नागरिकांचा खिसा आता आणखी रिकामा होणार आहे.