आमची गझलसाद ' ची गझल इतिहासात नोंद होईल

प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर ता.२५, मराठी मातीमध्ये गझल या काव्यप्रकाराचे बीजारोपण सुरेश भट यांनी केलं. गेल्या सहा - सात दशकांमध्ये मराठी गझलेचा मळा बहारदार होत फुलतो आहे. मराठी गझल दमदार वळणे घेत आहे. गझलेच्या संख्यात्मक वाढीइतकीच गझलेची गुणात्मक वाढही झाली पाहिजे,याकडे सुरेश भट कटाक्षाने लक्ष देत असत. किंबहुना त्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. तोच विचार,वसा व वारसा घेऊन गझलसाद समूह काम करत आहे. या समूहाच्या वतीने प्रकाशित होत असलेला 'आमची गझलसाद ' हा गझल संग्रह ही या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण नोंद ठरेल.  


मराठी गझलेच्या वाटचालीतील हा एक मैलाचा दगड आहे. गझलेच्या इतिहासात त्याची नोंद होईल असे मत ख्यातनाम गझलकारा व आम्ही लेखिकाच्या अध्यक्षा प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा ( मुंबई) यांनी व्यक्त केले.त्या सुरेश भट यांचा नव्वदावा जन्मदिन आणि गझलसादचा पाचवा वर्धापनदिन याचे औचित्य साधून प्रकाशित करण्यात येणाऱ्या ' आमची गझलसाद' या गझल संग्रहाचे प्रकाशन करताना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. प्रारंभी  सुरेश भट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.स्वागत प्रा.नरहर कुलकर्णी यांनी केले.प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांनी करून दिला. डॉ.दिलीप कुलकर्णी व अशोक वाडकर यांनी पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी श्रीराम पचिंद्रे ,डॉ.दयानंद काळे ,अरुण सुनगार ,प्रवीण पुजारी,मनीषा रायजादे ,सारिका पाटील आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.

 

प्रा.सुनंदा पाटील पुढे म्हणाल्या, या गझल संग्रहाला प्रस्तावना लिहितानाच यातील बारा गझलकारांच्या प्रत्येकी अकरा अशा १३२ गझल मी वाचलेल्या आहेत.जुन्या जाणत्या गझलकारांबरोबरच नव्या मंडळींची वाटचालही सक्षमपणे होते आहे याचा मनस्वी आनंद होतो आहे.हा संग्रह सुंदर गझला आणि उत्तम अंतर्बाह्य मांडणीमुळे देखणा झाला आहे.हे अभिनंदनीय आहे. यावेळीच आपण सर्वांनी व खास करून नव्या लिहित्या हातांनी हे समजून घेतले पाहिजे की,

केवळ गझल तंत्र शिकणे म्हणजे गझल आत्मसात करणे नव्हे.तर दोन ओळीच्या शेरात , पहिल्या ओळी नंतर श्रोत्यांनी दुस-या ओळीची वाट बघणे म्हणजे गझल . स्वतःच्याही नकळत रसिकांनी वाह अशी दाद देणे म्हणजे गझल . रसिकाच्या डोळ्यात पाणी आणणं किंवा प्रेमाचा ऋतू फुलवणं म्हणजे गझल . आधी आपल्यात कवित्व असावं लागतं , मग तांत्रिक बाबी आत्मसात केल्या की , गझल सहजपणे लेखणीतून झरू लागते. हे गझलकडे वळणाऱ्या नव्या कवीनी गंभीरपणे लक्षात घ्यावे.एकीकडे गेली चार - पाच दशके गझलेशी जुळून असतानाही आम्ही विद्यार्थी आहोत असं एक पिढी म्हणते , तर दुसरीकडे दोन चार गझल लिहिताच काहीजण स्वयंघोषित महागुरू होतात , ही मराठी गझले साठी चिंतेची बाब आहे .आपल्याला मराठी मातीचा दरवळ असणारी उत्तम प्रामाणिक गझल द्यायची आहे. म्हणून या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. यावेळी सुनंदा पाटील यांनी मराठी गझल उद्गम आणि विकास, सुरेश भट यांचे योगदान, मराठी गझलेची वाटचाल , बाराखडी ते अंकलिपी ,तिची शक्तीस्थाने आदी विविध मुद्द्यांवर अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य केले.

करवीर नगर वाचन मंदिराच्या सभागृहात झालेल्या या समारंभास ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, अनिल वेल्हाळ,प्राचार्य डॉ.सुभाष शेळके, डॉ.स्नेहल कुलकर्णी,पाटलोबा पाटील, माया कुलकर्णी, प्रा.शांताराम कांबळे,या संग्रहाचे मुखपृष्ठ आणि आतील रचना करणारे निखिल कुलकर्णी, अश्विनी टेंबे ,युवराज यादव,प्रवीण रायबागकर, जमीर तांबट यांच्यासह साहित्य कला क्षेत्रातील अनेक मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रवीण पुजारी यांनी आभार मानले.सारिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post