प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजपने चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी हिदुत्वाचा मुद्दा पुढे केला होता. परंतु, काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा या निवडणुकीत विजय झाला तर भाजपच्या सत्यजीत कदम यांचा पराभव झाला.
भाजपच्या या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीवेळी आणि त्याआधी केलेल्या वक्तव्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कोल्हापुरात पराभव झाला तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. शिवाय निवडणुकीच्या काळात मतदारसंघातील नागरिकांच्या खात्यावर पेटीएमद्वारे एक हजार रूपये जरी आले तरी त्याची ईडीकडून चौकशी होऊ शकते असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यांची हीच वक्तव्ये आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या या वक्तव्यांमुळेच चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.