भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम पराभूत झाले ..
कदम यांच्या पराभवामुळे महाडिक गट जिल्ह्याच्या राजकारणात मागे फेकला गेला
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८,९०१ मतांनी विजय मिळवला आहे.भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम पराभूत झाले आहेत. या विजयामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदाराचा मान जयश्री जाधव यांना मिळाला आहे. कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमान राखला असल्याची प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी दिली आहे.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री यांना मतदारांनी विजयी केले आहे. या निवडणुकीकडे काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असेच पाहिले गेले होते. जाधव यांच्या विजयामुळे सतेज पाटील यांची सरशी झाली आहे, तर होम टर्फवरच भाजपच्या उमदेवाराचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील यांची मात्र पिछेहाट झालेली आहे.
२०१९ला झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा चंद्रकांत जाधव यांनी पराभव केला होता. असे जरी असले तरी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. ही जागा काँग्रेसला गेल्यानंतर शिवसेना आणि राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी न करता काँग्रेसला सहकार्य केले. शिवसेनेची मते फोडण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण त्यात फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे जाधव यांच्या विजयात शिवसेनेने सिंहाचा वाटा उचलला. जोडीनेच राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनीही एक दिलाने प्रचार केल्याने जाधव यांचा विजय सुकर झाला.
महाडिक गटाची पिछेहाट ....
भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम हे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांचे नातलग आहेत. त्यामुळे महाडिक गट पूर्ण शक्तीने या निवडणुकीत उतरला होता. कदम यांच्या पराभवामुळे महाडिक गट जिल्ह्याच्या राजकारणात मागे फेकला गेला आहे. सतेज पाटील यांची महाडिक गटाविरुद्धच्या विजयाची मालिका या पोटनिवडणुकीतही सुरू राहिली आहे.
सतेज पाटील यांची यंत्रणा
पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रचाराची अवाढव्य यंत्रणा आहे. ही सर्व यंत्रणा जाधव यांच्या प्रचारासाठी कार्यरत होती. एका अर्थाने हा विजय सतेज पाटील यांच्या यंत्रणेचा आहे, असे म्हटले जात आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
जोतिबाच्या नावानं चांगभल म्हणत महिलांनी कपाळाला गुलाल लावला. अण्णांच्या माघारी आपली जबाबदारी…अशी घोषणा देत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली.
राजेश क्षीरसागरांचा प्रभाव असलेल्या भागातही जयश्री जाधवांना ‘लीड’
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला दिल्याने पोटनिवडणुकीत काय होणार? शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द राखणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, कट्टर शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द राखल्याचे प्रभागांमध्ये झालेल्या मतदानावरून दिसून येत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रभाव असलेल्या सिद्धार्थ नगर, बुधवार तालीम, खोलखंडोबा, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान, शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महाराणा प्रताप चौक, महानगरपालिका भागात जयश्री जाधव यांना लीड मिळाल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यासह पूर्ण राज्याची लक्ष वेधणारी निवडणूक
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत एकुण १५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव आणि भाजप पक्षाचे उमेदवार सत्यजीत कदम यांच्यात चुरशीची लढत झाली.
नगरसेविका ते आमदार
उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत अखेर श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी बाजी मारली आहे. या मतदारसंघातील त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. एकंदरीत ही निवडणुक राजकीय समीकरणे बदलवणारी ठरणार हाेती. यामुळे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली हाेती. त्यातून आरोप-प्रत्यारोप आणि त्यामुळे टोकाला गेलेली ईर्ष्या यातून निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
अण्णा नाहीत याची मला खंत आहे. त्यांची मला पावलोपावली आठवण येईल. अण्णांच्या माघारी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं. आता त्यांचे काेल्हापूरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव