कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप


प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघात एका जागेसाठी पोटनिवडणूक होतेय. या साठी आज (12 एप्रिल) मतदान सुरू आहे. कोल्हापूर मध्ये आज (12 एप्रिल) सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे.काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाले त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होते आहे. काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या रिंगणात आहेत, तर भाजप कडून सत्यजित कदम लढत आहेत.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक लढली जात आहे. त्यामुळं दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लावणारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातंय.भाजपकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार अशा नेत्यांच्या सभा झाल्या, तर महाविकास आघाडी सरकारमधील जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे अशा नेत्यांनी सभा घेतल्या

.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाइन सभा झाली. गेला महिनाभर आरोप प्रत्यारोप करत काँग्रेस विरुद्ध भाजप प्रचार रंगला होता.या मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.या मतदार संघात 2 लाख 91 हजार 539 इतके मतदार असून या मध्ये 1 लाख 45 हजार 626 पुरुष मतदार, 1 लाख 45 हजार 901 स्त्री मतदार, 95 सैनिक मतदार तर 12 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यासाठी 357 केंद्रांवर मतदान होणार असून यात 311 मुख्य केंद्रे तर 46 सहाय्यकारी केंद्रांचा समावेश आहे. 2 हजार 392 मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये 250 राखीव कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


या निवडणुकीसाठी 45 विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 7 अधिकारी राखीव आहेत. मतदानयंत्रं व कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी कोल्हापूर महापालिकेच्या 20 बस, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या 49 बस आणि 3 जीपची सोय करण्यात आली आहे. तर मतदानासाठी 472 मतदान यंत्रे असून 115 यंत्रे राखीव आहेत.

मतदार संघात मतदार केंद्र क्रमांक 97 आदर्श मतदान केंद्र, तर केंद्र क्रमांक 105 सखी मतदान केंद्र असून 108 मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक, 181 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग, 68 मतदान केंद्रांवर व्हीडिओग्राफी, 108 मतदान केंद्रांवर CPF ची सोय करण्यात आली आहे. 670 टपाली मतदारांपैकी 80 पेक्षा अधिक मतदारांचे मतदान लिफाफे प्राप्त झाले आहेत, यामध्ये 18 विकलांग मतदारांचा समावेश आहे.


Post a Comment

Previous Post Next Post