मतदारांना ईडीची धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातील मतदारांनी चांगलाच हिसका दाखवला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर :  मतदारांना ईडीची धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातील मतदारांनी चांगलाच हिसका दाखवला. मंगळवार पेठेतील अहिल्यादेवी मतदान केंद्रावर पाटील यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले.पाटील हे भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांसह तिथे आले असताना त्यांना मतदारांची नाराजी सहन करावी लागली. डोक्यावर टोप्या आणि गळ्यात उपरणी घातलेल्या कार्यकर्त्यांसह पाटील मतदान केंद्रावर आले असताना मतदारांनी जय जिजाऊ,जय शिवराय अशा घोषणा देत आसमंत दुमदुमून टाकला. नाराजी वाढत असल्याचे पाहून पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह गाडीत बसून तिथून निघून गेले.


पाटील हे जिल्ह्याबाहेरील 20-25 कार्यकर्त्यांसह टोप्या व गळ्यात पक्षाचे स्कार्फ घालून मतदान केंद्रावर आले होते. हे एकप्रकारचं दबावतंत्र व शक्तीप्रदर्शन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवार पेठेतील अहिल्यादेवी मतदान केंद्रावर पाटील आले तेव्हा संतप्त मतदार आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जय जिजाऊ,जय शिवराय अशा घोषणा देत त्यांना माघारी जाण्यास भाग पाडले. मतदान केंद्रावर घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांसह भेट देण्यास सुरुवात केली.पालकमंत्री सतेज पाटील यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कसबाबावडा परिसरातही त्यांनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या. मंगळवार पेठेत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कार्यालयाशेजारील अहिल्यादेवी मतदान केंद्रावर जिल्ह्याबाहेरील कार्यकर्त्यांना घेऊन, पक्षाच्या टोप्या तसेच स्कार्फ घालून एकप्रकारे दबावतंत्र व शक्ती प्रदर्शन करत असल्याचे दिसून येताच मतदार संतप्त झालेले पाहायला मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post