प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर (प्रतिनिधी) : 'या शकलांना सांधूया' ही प्रकाश नाईक यांची दीर्घ कविता मराठी साहित्यामध्ये दीर्घ कवितेच्या परंपरेतील अनोख, वेगळी आणि महत्त्वपूर्ण आहे . अण्णाभाऊंच्या वैश्विक विचारांना तितक्याच समर्थपणे कवी प्रकाश नाईक यांनी दीर्घ कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त केले आहे. ही दीर्घ कविता अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या क्रांतिकारी वैश्विक महानायकाला कवितेच्या माध्यमातून व्यक्त करणे हा सांस्कृतिक इतिहास आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कवी प्रकाश नाईक यांच्या 'या सकलांना सांधूया' या दीर्घ कवितेच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक निर्मिती प्रकाशनाचे अनिल म्हमाने यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी क्रांतिकारी विचार मांडला आहे. त्या विचारांचे प्रतिबिंब या कवितेत पडलेले असून ही कविता अण्णाभाऊंच्या विचारांच्या चळवळीला ऊर्जा देणारी आहे. सर्व प्रकारच्या भेदाच्या कुंपणांना नष्ट करून एक वैश्विक विचार मांडणारी ही कविता आहे. समतेचा व न्यायाचा विचार मांडणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्यावर अशी दीर्घकविता लिहीणे हा एक सांस्कृतिक इतिहास आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ख्यातनाम समीक्षक मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, ही दीर्घ कविता अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची क्रांती शलाका आहे. या कवितेतून जो सर्वहारा वर्गाच्या मुक्तीचा विचार मांडण्यात आलेला आहे, तो मराठी साहित्यामध्ये ठसा उमटविणारा आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र तत्वज्ञानाचे काव्यात्म रुप म्हणजे ही कविता आहे.
या वेळी बोलताना राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, भारतातल्या अलक्षित लोकांच्या वेदनेला वाचा फोडण्याचे साहित्य अण्णा भाऊ साठे निर्माण केले. त्या अण्णाभाऊंच्या बद्दल नव्या पिढीमध्ये या कवितेत मांडलेला विचार जाणे आवश्यक आहे. वाड़मयीन दृष्ट्या ही कविता अत्यंत सकस आहे. आशयाच्या दृष्टीनेही ही कवित अत्यंत महत्वपूर्ण आहे. ही कविता वर्तमानाला अत्यंत संवेदनशीलतेने भिडणारी आहे. यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर म्हणाले, ती कविता सर्व परिवर्तनवादी विचारांना ताकद देईल असा विश्वास वाटतो. यावेळी लालासाहेब नाईक, कवी प्रकाश नाईक, प्रकाशक अनिल म्हमाने यांची भाषणे झाली. कार्यक्रमास अशोक लोखंडे, प्रा. सुकुमार कांबळे, माजी आमदार राजीव आवळे, अरुण नरके, डॉ. उत्तम सकट, डॉ. शरद गायकवाड, भिकाजी लोखंडे, भारत धोंगडे, प्रज्ञा कांबळे, सुहास नाईक, पी. जी. साठे, दीपक तडाखे आदींसह साहित्य रसिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार सागर कांबळे यांनी मानले.