टक्केवारीचा समतोल कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत कोल्हापूरकरांमध्ये औत्सुक्याचे वातावरण
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. आजी-माजी पालकमंत्र्यांसह महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, टक्केवारीचा समतोल कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत कोल्हापूरकरांमध्ये औत्सुक्याचे वातावरण आहे.
काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले, पण सांत्वनासाठी जाधव यांच्या घरी गेलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याचा दिलेला प्रस्ताव जाधव यांनी फेटाळला. अखेर 2014 साली काँग्रेसच्या चिन्हावर लढलेले सत्यजित कदम यांना भाजपने उमेदवारी देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यावर पाणी फेरले.
दरम्यान, एरव्ही कोणत्याही पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरलेली असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत मात्र मतदानाची टक्केवारी तशीच राहिली. गतवेळच्या निवडणुकीपेक्षा सरासरी एक टक्का मतदान वाढल्याचे दिसून आले. गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे चुरशीने व मोठय़ा संख्येने मतदान होईल, असा अंदाज टक्केवारीनंतर फोल ठरला. मतदानानंतर विजयाचा दावा दोन्ही बाजूकडून करण्यात येत आहे. मतांची टक्केवारी समान असली तरी येथे आश्चर्यकारक निकालाची परंपरा आहे. वाढीव टक्का म्हणजे प्रस्थापितांना विरोध हा इतर मतदारसंघातील निकष कोल्हापूर शहरात लागू होत नाही. कोणाच्या विजयासाठी नव्हे, तर पाडण्यासाठीच कोल्हापूरकर मतदान करत असल्याचेही अनुभव आहेत.